एपी, ऑरम
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्ती, पुराणमतवादी, उजव्या विचारसरणीचे पुरस्कर्ते चार्ली कर्क (वय ३१) यांची यूटाह येथील महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमात गोळी झाडून हत्या करण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा ध्वज निम्म्यावर उतरवण्याचे आदेश दिले असून, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी घटनेचा निषेध केला आहे.
चार्ली कर्क हे ‘टर्निंग पॉइंट यूएसए’ या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष होते. ट्रम्प यांना अध्यक्षपदाची उमेदवारी घोषित झाल्यापासून कर्क यांचा त्यांना पाठिंबा होता. निवडणूक प्रचारामध्ये ट्रम्प यांच्या सर्वांत मोठ्या मुलाचे वैयक्तिक सहायक म्हणूनही कर्क यांनी काम केले. ‘टर्निंग पॉइंट’ संस्थेच्या विविध कार्यक्रमांत ट्रम्प आणि त्यांचा मोठा मुलगा बऱ्याचदा उपस्थित राहत असत.
ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमावरून कर्क यांच्या मृत्यूची माहिती दिली. कर्क यांच्या कार्याचे ट्रम्प यांनी कौतुक केले. त्यांनी ‘ट्रूथ सोशल’वर म्हटले, ‘कर्क अतिशय महान होते. अमेरिकेमध्ये तरुणांना समजून घेण्याची क्षमता चार्ली यांच्याखेरीज क्वचितच कुणामध्ये असेल.’ या घटनेशी संबंधित एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असले, तरी कुठल्याही संशयिताला अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती ऑरमचे महापौर डेव्हिड यंग यांनी दिली.