Donald Trump Tariff War : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार युद्ध सुरू आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतातील आयटी आउससोर्सिंग थांबवण्याच्या विचारात असल्याचा दावा त्यांच्या सहकारी आणि कट्टर उजव्या विचारसरणीच्या नेत्या लॉरा लूमर यांनी केला आहे.

“अमेरिकन आयटी कंपन्यांना भारतातील कंपन्याकडे काम आउटसोर्स करण्यापासून रोखण्याचा विचार डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास, तुम्हाला इंग्रजीसाठी यापुढे २ प्रेस करण्याची आवश्यकता नाही. मेक कॉल सेंटर्स अमेरिकन अगेन!” असे लॉरा लूमर त्यांच्या एक्सवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

“ज्यांना इंग्रजी येत नाही अशा एखाद्याशी इंग्रजीत बोलण्यासाठी २ प्रेस करण्याचे दिवस डोनाल्ड ट्रम्प संपवणार, यासाठी मी खूप उत्सुक आहे. खूपच छान.” असे लॉरा लूमर यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यांनी अमेरिकन कॉल सेंटर्सच्या संदर्भात हा उल्लेख केला. लूमर या ट्रम्प प्रशासनाचा भाग नसल्या तरी त्यांचा प्रभाव गेल्या काही दिवसात वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी भारत रशियन तेल खरेदी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर दंडात्मक कारवाई म्हणून भारतावर ५० टक्के आयात शुल्क लावले आहे. यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध तणावाचे बनले असून ट्रम्प प्रशासनातील अनेकांनी भारताच्या विरोधात वक्तव्य केली आहेत.

लॉरा लूमरने उल्लेख केला ते ‘प्रेस २ फॉर इंग्लिश’ म्हणजे काय?

अमेरिकेत ऑटोमेटेड कस्टमर सर्व्हिस मेन्यूमध्ये फोन करणाऱ्यांना पर्याय दिले जातात, ज्यामध्ये स्पॅनिश भाषेसाठी १ दाबा आणि इंग्रजीसाठी २ दाबा, असा पर्याय दिलेला असतो. खर्च वाचवण्यासाठी अनेक अमेरिकन कंपन्या कस्टमर सर्व्हिस ही भारतातून आउटसोर्स करतात. भारतात प्रशिक्षण दिलेले एजंट अमेरिकन ग्राहकांना त्यांच्या अडचणींमध्ये मदत करतात.

दरम्यान ट्रम्प या मुद्द्यावर नेमकं काय करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ते परदेशी कर्मचाऱ्यांवर टॅरिफ लादणार की अमेरिकन कंपन्यांना भारतात काम आउटसोर्स करण्यावर बंधने लादणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र येत्या काळात आयटी क्षेत्राशी संबंधित काही मोठे धोरणात्मक बदल केले जाण्याची शक्यता आहे.