अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर चर्चेविनाच एकतर्फी ५० टक्के आयातशुल्क लादले आहे. १ ऑगस्टपूर्वी त्यांनी २५ टक्के आयातशुल्काची अंमलबजावणी केली. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी पुन्हा एकदा अतिरिक्त २५ टक्के कर लादला. भारतापूर्वी ट्रम्प यांनी चीनवरही अशाचप्रकारचा अवाजवी कर लादण्याचा प्रयत्न केला होता. ट्रम्प यांच्या धोरणावर आता अमेरिकेतूनच टीका होऊ लागली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि जॉन हॉपिकन्स विद्यापीठाचे प्राध्यापक स्टीव्ह हँके यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.
एनडीटीव्हीशी बोलत असताना स्टीव्ह हँके म्हणाले, “ट्रम्प यांचा टॅरिफ वाढीचा निर्णय हा पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो दीर्घकाळ टिकणार नाही. त्यांचे अर्थशास्त्र पूर्णपणे गंडले आहे. तसेच व्यापार युद्ध सुरू करून ट्रम्प स्वतःचा नाश करत आहेत.”
आपल्या विधानासाठी प्राध्यापक हँके यांनी नेपोलियनचे एक वाक्य उद्धृत केले. शत्रू स्वतःचा नाश करत असताना त्यात कधीही हस्तक्षेप करू नका. मला वाटते ट्रम्प स्वतःचाच नाश करत आहेत.
भारताबाबत बोलत असताना प्राध्यापक हँके म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे पत्ते राखून ठेवावेत आणि थोडा वेळ वाट पाहावी. मी हे सांगतोय कारण, ट्रम्प यांचे पत्यांचे घर (हाऊस ऑफ कार्ड्स) हे काही दिवसांतच कोसळले. टॅरिफचे तुणतुणे अधिक काळ वाजणार नाही.”
अमेरिकेचा खर्च हा सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा जास्त आहे, त्यामुळे अमेरिकेत मोठी व्यापार तूट असल्याचा दावा प्राध्यापक हँके यांनी केला. त्यामुळेच ट्रम्प यांचे अर्थशास्त्र अतिशय वाईट आहे, असे हँके म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफचा भारताने निषेध केलेला आहे. ही करवाढ अन्यायकारक, अवाजवी असल्याची टीका भारताने केली आहे. भारत या आर्थिक दबावांपुढे झुकणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी स्पष्ट केले. टॅरिफ वाढीचा फटका भारताच्या कापड, सागरी वस्तू आणि चामड्याच्या निर्यातीला बसण्याची शक्यता आहे.