Donald Trump health अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना क्रॉनिक व्हेनस इनसफीशियन्सी असल्याचे निदान झाले आहे. हा आजार नसांशी संबंधित असून वृद्धांमध्ये सामान्य आहे. या आजारामुळे नसांमध्ये रक्त साचते, असे व्हाईट हाऊसने सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांना पायांमध्ये सूज आल्याचे लक्षात येताच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांना या आजाराचे निदान झाले. त्यांना नियमित वैद्यकीय काळजी आणि भरपूर सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असल्याचे व्हाईट हाऊस मेडिकल युनिटने सांगितले आहे.

व्हाईट हाऊसने काय म्हटले?

क्रॉनिक व्हेनस इंसफिशिएन्सी असलेल्या रुग्णांच्या पायांच्या नसा रक्त परत हृदयात योग्यरित्या वाहून नेऊ शकत नाही. रक्तवाहिन्यांमध्ये असणारे लहान व्हॉल खराब झाल्यास रक्त ह्रदयाकडे जाण्याऐवजी परत खाली वाहून पायांमध्ये जमा होऊ शकते. पत्रकार परिषदेत यूएस प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी ट्रम्प यांच्या हाताच्या मागील बाजूस जखमांविषयीदेखील सांगितले.

ही सॉफ्ट टिश्यूंची समस्या असल्याचे त्यांनी म्हटले. ही समस्या अ‍ॅस्पिरिन घेतल्याने आणि लोकांशी वारंवार हस्तांदोलन केल्याने उद्भवत असल्याचे त्या पुढे म्हणाल्या. त्यांनी पुढे माहिती दिली की, डोनाल्ड ट्रम्प हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी अ‍ॅस्पिरिन घेतात.

निदानानंतर व्हाईट हाउसने जारी केलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, “राष्ट्राध्यक्षांच्या अलीकडील फोटोंमध्ये त्यांच्या हाताच्या मागील बाजूस किरकोळ जखम दिसून आली आहे. हा वारंवार हस्तांदोलन आणि अ‍ॅस्पिरिनच्या वापरा सौम्य दुष्परिणाम आहे, जो सामान्य आहे, ” असे त्यात सांगण्यात आले. व्हाईट हाऊसने माहिती दिली की, इतर चाचण्यांमध्ये ट्रम्प यांना हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणे किंवा यासंबंधित आजाराची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. लेविट यांनी पत्रकारांना सांगितले, “राष्ट्राध्यक्षांची तब्येत उत्तम आहे, जी तुम्ही सर्वजण दररोज पाहत आहात असे मला वाटते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पत्रकार परिषदेदरम्यान, त्यांनी स्पष्ट केले की ट्रम्प यांच्या वैद्यकीय तपासणीची माहिती उघड करण्याचा उद्देश राष्ट्राध्यक्षांच्या प्रकृतीबद्दलच्या अलिकडच्या अटकळींना पूर्णविराम देणे आहे. एप्रिलमध्ये, ट्रम्प यांनी अनेक वैद्यकीय तज्ज्ञांकडून शारीरिक तपासणी केली. परंतु, व्हाईट हाऊसने त्यावेळी प्रसिद्ध केलेल्या तीन पानांच्या अहवालात या आजाराविषयी कोणतीही माहिती दिली नव्हती.