Donald Trump on US Imports from Russia : भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच ट्रम्प यांना अमेरिका रशियाकडून आयात करत असलेल्या उत्पादनांवरून प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर ट्रम्प यांची भंबेरी उडाल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले, “मला याबद्दल माहिती नाही. मी याप्रकरणी तपास करेन.” खतं व रसायिक पदार्थांच्या आयातीवरून प्रश्न विचारल्यावर ट्रम्प म्हणाले, “अमेरिका रशियाकडून रासायनिक पदार्थ व खते आयात करत असल्याची मला काहीच कल्पना नाही.”
भारतीय माध्यमांनी दावा केला होता की अमेरिका त्यांच्या आण्विक कार्यक्रमासाठी, इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी रशियाकडून यूरेनियम हेक्साफ्लोराइड, पॅलेडियम, खते व रासायनिक पदार्थ आयात करते. त्यावर ट्रम्प यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यावर ते गोंधळल्याचं पाहायला मिळालं. ट्र्म्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी एएनआय या वृत्तसंस्थेने ट्रम्प यांना अमिरेका रशियाकडून आयात करत असलेल्या उत्पादनांबाबत प्रश्न विचारले होते.
डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?
यावेळी ट्रम्प म्हणाले, “मला त्याबद्दल काहीच माहिती नाही. आम्हाला याचा तपास करावा लागेल. दरम्यान, एएनआयने ट्रम्प यांच्या प्रेस टीमशी संपर्क साधला असून भारतीय माध्यमांना ट्रम्प प्रशासनाकडून उत्तराची अपेक्षा आहे.”
एका बाजूला ट्रम्प भारतासह जगभरातील अनेक देशांना रशियाकडून कोणत्याही प्रकारची आयात करू नका असं सांगतं आहेत. तसेच ट्रम्प यांनी रशियाबरोबर व्यापार करणाऱ्या देशांविरोधात टॅरिफ (आयात शुल्क) अस्त्र उगारलं आहे. मात्र, अमेरिका रशियाकडून रासायनिक पदार्थ व खतं आयात करत असल्याच्या दाव्यामुळे जगभरात अमेरिकेची थट्टा उडवली जात आहे.
अमेरिकेचा भारताला २४ तासांत आणखी कर लादण्याचा इशारा
इशारा दिल्यानंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी चालू ठेवल्यामुळे पुढील २४ तासांत भारतावर लक्षणीय प्रमाणात आयात शुल्क लादले जाईल, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दिला होता. तसेच भारत अमेरिकेकडून आकारत असलेले आयात शुल्क जगात सर्वाधिक असल्याच्या आरोपाचाही त्यांनी पुनरुच्चारही केला. त्यानंतर भारताने अमेरिका व रशियामधील व्यापारावर बोट ठेवलं आहे.