अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘फेडरल रिझर्व्ह बँके’च्या गव्हर्नर लिसा कूक यांची सोमवारी रात्री हकालपट्टी केली. मध्यवर्ती बँकेवरील नियंत्रणावरून ट्रम्प यांनी देशांतर्गत आता नवी आघाडी उघडली आहे. फेडरल गव्हर्नर बोर्डाच्या लिसा या पहिला कृष्णवर्णीय महिला होत्या.
ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रूथ सोशल’ या सामाजिक माध्यमावर पोस्ट करून तारण कर्जांमध्ये घोटाळा केल्यावरून कूक यांची हकालपट्टी केल्याचे म्हटले आहे. ‘फॅनी मे अँड फ्रेडी मॅक’ ही सरकारी आस्थापना तारण कर्ज नियमित करते. ट्रम्प यांनी या संस्थेवर बिल पल्ट यांची नियुक्ती केली आहे. या आस्थापनेने गेल्या आठवड्यात लिसा यांच्यावर आरोप केला होता. ‘लिसा कूक यांनी अधिक तारण कर्ज मिळविण्यासाठी २०२१ मध्ये मिशिगन आणि अटलांटा येथे दोन निवासस्थाने सांगितली होती. भाड्याने दिलेल्या अथवा मालमत्ता म्हणून खरेदी केलेल्या दुसऱ्या घरावर अधिक कर्ज मिळते,’ असा आरोप पल्ट यांनी केला होता.
ट्रम्प यांनी कूक यांना यापूर्वीच राजीनामा देण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी दिला नाही. त्यानंतर ट्रम्प यांनी त्यांना हटविण्यात आल्याची घोषणा केली. ‘फेडरल रिझर्व्ह’चे सात सदस्य असतात. ट्रम्प यांच्या घोषणेचे गंभीर आर्थिक आणि राजकीय परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कूक यांना हटविण्याचे अधिकार आपल्याला असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. फेडरल रिझर्व्हचे स्वतंत्र अस्तित्व आणि त्यावरील नियंत्रणावर ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता असून, निकाल लागेपर्यंत कूक पदावर राहू शकतील, असे म्हटले जात आहे.
ट्रम्प यांनी सातत्याने स्वायत्त आणि स्वतंत्र अस्तित्व असलेल्या संस्थांना लक्ष्य केले आहे. कमी कालावधीच्या कर्जांवरील व्याजदर कमी करावेत, अशी मागणी करून त्यावरून फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांचीही हकालपट्टी करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.