अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदावर असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी अशी काही कृती केली होती की अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असणाऱ्या व्हाइट हाऊसचं टॉयलेट देखील तुंबलं होतं. विशेष म्हणजे आता हे प्रकरण चर्चेत आलं असून यासंदर्भात ट्रम्प यांची चौकशी केली जावी अशी मागणीही केली जातेय. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष असताना अनेक सरकारी कागदपत्रं फाडून टॉयलेटमध्ये फ्लश करायचे असे आरोप करण्यात आलेत. एकदा त्यांनी अशाचप्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात कागद फ्लश केले की व्हाइट हाऊसचं टॉयलेट तुंबलं होतं.

‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष असताना अनेकदा प्रोटोकॉल तोडलेत. मात्र आता राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातील कार्यालयीन कागदपत्रांची देखभाल करणाऱ्या नॅशनल अर्काइव्हसंदर्भातील प्रकरण समोर आलं आहे. आता नॅशनल अर्काइव्हने माजी राष्ट्राध्यक्षांशी संबंधित इतर प्रकरणांबरोबरच त्यांच्या कागद फाडून फेकण्याच्या, सरकारी कागपत्रं फ्लश करुन नष्ट करण्याच्या सवयीचाही तपास करावा अशी मागणी केलीय. ट्रम्प यांनी अधिकृत कागदपत्रं फ्लोरिडाला पाठवली होती असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय.

नॅशनल अर्काइव्हच्या दाव्यानुसार, पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी ट्रम्प यांनी लढलेल्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांनी व्हाइट हाऊस सोडलं. पण व्हाइट हाऊस सोडताना ट्रम्प यांनी १५ बॉक्स भरुन कागदपत्रं स्वत: सोबत नेली होती. ही कागदपत्रं नंतर मार-ए-लागो या फ्लोरिडामधील रिसॉर्टमधून ताब्यात घेण्यात आलेली. यामध्ये उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनसोबत केलेल्या पत्रव्यवहाराच्या कागदपत्रांचाही समावेश होता.

कागदपत्रांशीसंबंधित वॉटरगेट प्रकरणानंतर १९७८ साली राष्ट्राध्यक्ष नोंदणी अधिनियम म्हणजेच पीआरए हा कायदा लागू करण्यात आला. या कायद्यानुसार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांचे सर्व ईमेल, पत्र आणि अन्य कामाकाजासंदर्भातील कागदपत्रं नॅशनल अर्काइव्हला सुपूर्द करावी लागतात. मात्र ट्रम्प यांनी हा नियम मोडला. आता याचवरुन त्यांची चौकशी केली जावी अशी मागणी होताना दिसतेय.

न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकार मॅगी हैबरमॅन यांनी ‘कॉन्फिडन्स मॅन’ या पुस्तकामध्ये या प्रकरणाबद्दल सविस्तर लिहिलं आहे. या पुस्तकातील उल्लेखाप्रमाणे व्हाइट हाऊसच्या कार्मचाऱ्यांना फाडून फ्लश केलेल्या कागदांमुळे टॉयलेट तुंबल्याचं दिसून आलं. मात्र ट्रम्प यांनी हे आरोप फेटाळून लावलेत.

“माझ्याबद्दल जे दाखवलं किंवा सांगितलं जातंय त्या सर्व फेक न्यूज आहेत. राष्ट्राध्यक्ष असताना माझे नॅशनल अर्काइव्हसोबत चांगले संबंध होतं. आमच्यात कोणताही वाद नव्हता,” असा दावा ट्रम्प यांनी केलाय.