Effect of Donald Trump Tariffs On India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल आयात करत असल्याचे कारण देत भारतीय मालावर ५० टक्के आयात शुल्क लादले आहे. या निर्णयानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी ट्रम्प यांचा भारतावर शुक्ल लादण्याचा निर्णयाचे परिणाम अमेरिकेसाठी अत्यंत वाईट ठरल्याचे म्हटले आहे, यामुळे नवी दिल्लीला दूर ढकलण्यात आले आणि रशिया आणि चीनपासून भारताला दूर कारण्याच्या अमेरिकेच्या दशकांच्या प्रयत्नांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

बोल्टन म्हणाले की, त्यांच्या निर्णयाचा उलटा परिणाम झाला, भारताबरोबरचे संबंध ताणले आणि चीनला मोकळीक देण्यात आली आणि यामुळे अमेरिकेचे महत्त्वाचे ध्येय कमकुवत झाले. नवी दिल्लीवर रशियन तेल खेरीदी केल्याच्या मुद्द्यावर लावण्यात आलेल्या प्रचंड शुल्काकडेही बोल्टन यांनी बोट दाखवले आणि याचवेळी ट्रम्प हे भारतापेक्षा चीनला पसंती देत असल्याचा आरोपही केला, तसेच ही एक प्रचंड मोठी चूक ठरू शकते असेही ते यावेळी म्हणाले.

ट्र्म्प यांनी एप्रिल महिन्यात माफक प्रमाणात चीनबरोबर टॅरिफवरून संघर्ष झाला पण त्यांच्यात करार केला जाणार असल्याने तो वाढणार नाही याची काळजी घेण्यात आली. तर दुसरीकडे रशियाला युक्रेनविरोधातील लढाईत आर्थिक निधी पुरवत असल्याचा दावा करत भारतावर ५० टक्के शुल्क लादण्यात आले आहे.

सीएनएनशी बोलताना बोल्टन म्हणाले की, हे गमतीशीर आहे की रशियाला नुकसान पोहचवण्यासाठी असलेले सेंकंडरी टॅरिफ हे भारताला रशिया आणि चीन यांच्या जवळ घेऊन जाऊ शकते आणि कदाचित हे तिन्ही देशांना एकत्र अमेरिकेबरोबर वाटाघाटी करण्यास परावृत्त करू शकते.

“ट्रम्प यांची चीनवर दाखवलेली उदारता आणि भारतावर मोठ्या प्रमाणात शुल्क लादणे यामुळे रशिया आणि चीन यांच्यापासून भारताला दूर आणण्याचे अमेरिकेचे दशकांपासूनचे प्रयत्न धोक्यात आले आहेत,” असे बोल्टन म्हणाले.

‘द हिल’मध्ये लिहिलेल्या एका लेखात बोल्टन म्हणाले की, ट्रम्प यांची बिजिंगबाबत सौम्य भूमिका ही चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर करार करण्याच्या उत्साहात अमेरिकेच्या धोरणात्मक हितसंबंधांचा बळी देण्यासारखे आहे. “नवी दिल्लीवर लादण्यात आलेल्या शुल्काच्या तुलनेत व्हाईट हाऊस बिजिंगच्या बाबतीत टॅरिफ दर आणि इतर बाबतीत अधिक सौम्य भूमिका घेण्याच्या वाटेवर असल्याचे दिसून येते. जर असे असेल तर कदाचित ही एक प्रचंड मोठी चूक असू शकते,” असे त्यांनी लिहिले आहे.

ट्रम्प यांनी लादलेल्या अतिरिक्त टॅरिफमुळे भारताने रशियाकडून तेल खेरीदी करणे बंद तर केले नाहीच, उलट भारताने ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ हे अन्याय्य आणि अवास्तव असल्याचे म्हटले आहे. यादरम्यान रशियाने भारताला पाठिंबा दिला आहे आणि अमेरिकेवर बेकायदेशीर व्यापार दबाव टाकल्याचा आरोप केला आहे.