Donald Trump fresh tariff threat over digital tax : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़् ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफ लादण्याचा इशारा जारी केला आहे. अमेरिकेच्या तंत्रज्ञान कंपन्यांवर डिजिटल कर लावण्याचे धोरण मागे घेतले नाही तर त्यांच्याकडून अमेरिकेत केल्या जाणाऱ्या निर्यातीवर अतिरिक्त शुल्क लादले जाईल असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या प्लॅटफॉर्मवर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये त्यांनी टॅरिफसंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अल्फाबेटची गूगल, मेटाची फेसबुक, अॅपल आणि अॅमेझॉन यांसारख्या अमेरिकन कंपन्यांना अन्यायकारक पद्धतीने लक्ष्य केले जाते, तर दुसरीकडे चिनी तंत्रज्ञान कंपन्यांना मात्र यापासून सूट दिली जाते, असे ट्रम्प त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

“अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हून मी आपल्या बड्या अमेरिकन टेक कंपन्यांवर हल्ला करणाऱ्या देशांविरोधात मी उभा राहीन,” असे ट्रम्प म्हणाले आहेत. “डिजीटल टॅक्सेस, डिजिटल सर्व्हिसेस कायदे, डिजिटल मार्केट रेग्युलेशन्स हे अमेरिकन तंत्रज्ञानाला नुकसान पोहचवणे किंवा त्यांच्याविरुद्ध भेदभाव करण्यासाठी तयार केलेले आहेत. याबरोबरच ते धक्कादायकपणे यातून चीनमधील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना पूर्णपणे सूट देतात. हे त्वरित थांबले पाहिजे, आणि आत्ताच थांबले पाहिजे,” असेही ट्रम्प म्हणाले आहेत.

जर या देशांनी असे कायदे मागे घेतले नाहीत तर ते या देशांच्या मालावर आणि मोठ्या प्रमाणात अतिरिक्त टॅरिफ आणि त्यांच्याकडे जाणारे अमेरिकन तंत्रज्ञान आणि चिप यांच्या निर्यातीवर निर्बंध लादतील, असेही ट्रम्प म्हणाले आहेत.

ट्रम्प पुढे म्हणाले की, “अमेरिका आणि अमेरिकन तंत्रज्ञान हे आता जगासाठी ‘पिगी बँक’ किंवा ‘पायपुसणी’ राहिलेले नाही. अमेरिकेचा आणि आमच्या टेक कंपन्यांचा सन्मान करा, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहा!”

युरोपासह अनेक देशांनी डिजिटल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या कमाईवर मोठे कर लादले आहेत. व्यापार संबंधांमध्ये हा मुद्दा अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. ट्रम्प आणि बायडेन या दोघांच्या प्रशासनाने अमेरिकन कंपन्यावर लावण्यात येणाऱ्या करांचा मुद्दा उपस्थित केला आहे. डिजिटल सर्व्हिस टॅक्सच्या मुद्द्यावर यापूर्वीही ट्रम्प यांनी फ्रान्स आणि कॅनडा यांच्यावर टॅरिफ लादण्याचा इशारा दिला होता.

ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच आयात केलेले फर्निचरवर आणि इतर डझनभर उत्पादनांवर कर वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आता हा इशारा दिला आहे. मात्र या इशाऱ्यामुळे जागतिक बाजारात पुन्हा अस्थिरता पसरू शकते, ज्यामुळे अमेरिकेचे काही महत्त्वाच्या भागिदार देशांबरोबरचे संबंध ताणले जाऊ शकतात.