Donlad Trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. या आदेशावर सही करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की भारतावर आपण अतिरिक्त २५ टक्के आयातशुल्क लावलं आहे. भारताने रशियाकडून कच्चं तेल घेणं सुरुच ठेवलं आहे त्यामुळे हा निर्णय आपण घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्याने आता भारतावर अमेरिकेने लादलेलं एकूण आयात शुल्क ५० टक्के झालं आहे. या स्थितीत आपल्या देशापुढे काय पर्याय आहेत आपण जाणून घेऊ.
भारताची अतिरिक्त शुल्कावर प्रतिक्रिया काय?
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्कामुळे भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी आज केलेल्या अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्काच्या घोषणेनंतर भारताने प्रतिक्रिया देत अमेरिकेला ठणकावलं आहे. अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी, अवास्तव आणि अन्यायकारक असल्याचं भारताने म्हटलं आहे. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत ही प्रतिक्रिया दिली आहे. अशा स्थितीत काय पर्याय असू शकतील हे समजून घेऊ.
पर्याय क्रमांक १, २१ दिवसांची मुदत
अमेरिकेने भारतावर जे अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावलं आहे तो निर्णय २१ दिवसांनी अमलात येईल. याचाच अर्थ भारताकडे आजपासून २१ दिवसांची मुदत आहे. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये चर्चा घडून कुठलाही तरी मार्ग निघू शकतो अशी शक्यत आहे.
पर्याय क्रमांक २ काय?
भारताने अमेरिकेशी धोरणात्मक चर्चा करुन यावरचा पर्याय काढणं हा दुसरा पर्याय असू शकतो. टॅरिफ २५ टक्केच ठेवावं आणि अतरिक्त २५ टक्के लादू नये हे भारताने अमेरिकेला सांगावं त्यासाठी रशियाकडून कच्चं तेल घेण्याचं प्रमाण भारत कमी करेल हे आश्वासन भारताकडून दिलं जाऊ शकतं. तसं झाल्यास अमेरिका सामोपचाराने विचार करुन यातून दोन्ही देश मार्ग काढू शकतात.
पर्याय ३ रा, लादलेल्या अतिरिक्त कराविरोधात आवाज उठवणं
अमेरिकेने भारतावर जे अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावलं आहे, त्याविरोधात आवाज उठवला जाऊ शकतो. हा प्रश्न विश्व व्यापार संघटनेकडे म्हणजेच WTO च्या मंचावर उपस्थित केला गेला आणि हे सांगण्यात आलं की अशा प्रकारे टॅरिफ लावणं हे अन्यायकारक आणि WTO च्या नियमांचं उल्लंघन करणारं आहे तर भारताला या मुद्द्यावर पाठिंबा मिळू शकतो. भारत G20 आणि BRICS सारख्या मंचांवरही हा मुद्दा उचलून धरु शकते. टॅरिफ प्रभाव हा संतुलित करण्यावर भारत भर देऊ शकतो.
पर्याय क्रमांक ४, रशियासह एकत्र येत राजकीय धोरण आखणं
२५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्यामागचं कारण रशियाकडून भारत जे कच्चं तेल खरेदी करतो तो मुद्दा आहे. आता या परिस्थितीवर रशियाशी चर्चा करुन त्यातून नवी रणनीती आखली जाऊ शकते.
पाचवा पर्याय काय असू शकतो?
भारत आणि अमेरिका यांच्यात टॅरिफवरची चर्चा यशस्वी झाली नाही आणि सुवर्णमध्य गाठला गेला नाही तर भारतही निवडक गोष्टींवरचं टॅरिफ वाढवून अमेरिकेला थेट उत्तर देऊ शकतो. याआधी २०१९ मध्ये भारताने अमेरिकेतील बदाम, सफरचंद आणि स्टील यांवर कर लावला आहे. असाच पर्याय आत्ताही निवडला जाऊ शकतो. आज तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे.