scorecardresearch

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोपपत्र दाखल; ही नामुष्की ओढवलेले अमेरिकेचे पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणींमध्ये भर

Donald Trump porn actor Stormy Daniels case
डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणींमध्ये भर

पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सच्या भरपाईच्या प्रकरणात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झालं आहे. अशा प्रकारची नामुष्की ओढवलेले डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं असलं तरीही नेमके आरोप काय आहेत? ते सार्वजनिक करण्यात आलेलं नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात चालणार खटला

पॉर्न स्टार नुकसान भरपाई प्रकरणात आरोपपत्र दाखल झालं असल्याने आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात खटला दाखल केला जाणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या वेळी पॉर्न स्टारला तोंड बंद ठेवण्यासाठी दिलेल्या पैशांचं हे प्रकरण आहे. यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

दुसरीकडे पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सच्या वकिलांनी हे सांगितलं आहे की, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल होणं आणि त्यानंतर त्यांच्याविरोधात खटला चालणार ही बाब समोर येणं म्हणजेच कायद्यापेक्षा मोठं कुणीही नाही हेच दाखवून देणारं उदाहरण ठरलं आहे.

ट्रम्प यांच्याविरोधातील आरोप काय आहेत?

राॅयटर्स (Reuters) या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, मॅनहॅटन जिल्ह्याचे वकील अलविन ब्रॅग यांनी न्यू यॉर्क ग्रँड ज्युरी न्यायालयात पुरावा सादर करताना निदर्शनास आणून दिले की, ट्रम्प यांच्यासोबतच्या प्रेमप्रकरणाची कुठेही वाच्यता करू नये, यासाठी स्टॉर्मी डॅनियलला १ लाख ३० हजार डॉलर एवढी रक्कम देण्यात आली. स्टॉर्मीचे खरे नाव स्टेफनी क्लिफॉर्ड आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार करत असताना ही रक्कम देण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.

ट्रम्प यांचे वकील मायकल कोहेन यांनी हे पैसे क्लिफॉर्डला दिले आणि त्यानंतर ट्रम्प यांनी मायकल कोहेन यांना या पैशांची भरपाई करून दिली. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, कोहेन यांना दिलेल्या रकमेची नोंद ही कायदेशीर शुल्काच्या स्वरूपात करण्यात आली आहे. 

स्टॉर्मी डॅनियल कोण आहे? हे प्रकरण बाहेर कसे आले?

‘न्यू यॉर्क टाइम्स’ने दिलेल्या बातमीनुसार, स्टॉर्मी डॅनियल २००६ पासून तिच्या या प्रेमप्रकरणाची गोष्ट विकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर तिने दावा केला की, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘द अँप्रेटिस’ (The Apprentice) या रिॲलिटी शोमध्ये काम देण्याचा बहाणा करून तिच्याशी जवळीक साधली आणि तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. ट्रम्प यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे. दरम्यान २००६ साली या दोघांचाही एकमेकांसोबतचा एक फोटो प्रसिद्ध झालेला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 08:07 IST

संबंधित बातम्या