मागील दोन वर्षांत हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला इस्रायल-हमास संघर्ष संपुष्टात यावा, यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी २० मुद्द्यांचा समावेश असलेला शांततेचा प्रस्ताव जाहीर केला. ट्रम्प यांच्या प्रस्तावाला इस्रायलने मान्यता दिली आहे, तर यावर अभ्यास करून प्रतिसाद देऊ, अशी प्रतिक्रिया हमासने दिली आहे.

हा प्रस्ताव हमासने धुडकावला, तर हमासचा पराभव करण्यासाठी इस्रायलला अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा असेल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांची व्हाइट हाऊस येथे भेट घेतली. त्यावेळी हा प्रस्ताव जाहीर करण्यात आला. त्यानुसार युद्धग्रस्त पॅलेस्टिनी भूभागात तात्पुरते प्रशासकीय मंडळ तयार करण्यात येणार असून, त्याचे नेतृत्व खुद्द डोनाल्ड ट्रम्प करणार आहेत. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचाही या मंडळात समावेश असेल. या नियोजनानुसार, गाझामधील लोकांना दुसरीकडे विस्थापित होण्याची गरज नाही. युद्धविराम लागू झाल्यानंतर ७२ तासांत हमासने ओलीस ठेवलेले इस्रायली नागरिक जिवंत अथवा मृत परत द्यावेत; तसेच पॅलेस्टाइनमधील प्रशासनात हमासला यापुढे कुठलीही भूमिका बजावता येणार नाही, असेही या प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे.

कतारचे पंतप्रधान आणि इजिप्तच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी हा प्रस्ताव हमासबरोबर चर्चा करणाऱ्यांना दाखवला. त्यानंतर गाझातील प्रशासनामध्ये पुन्हा येणार नसल्याचे ‘हमास’ने मान्य केल्याची चर्चा आहे. मात्र, हा गट निःशस्त्र होण्यास राजी नसल्याचे समजते.

गाझामधील संघर्ष संपविण्यासाठी ट्रम्प यांनी केलेल्या सर्वसमावेशक नियोजनाच्या घोषणेचे आम्ही स्वागत करतो. इस्रायल आणि पॅलेस्टिनी नागरिक आणि विस्तृत अशा पश्चिम आशियाच्या क्षेत्रामध्ये दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी हा व्यवहार्य मार्ग आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

आपण शांततेच्या खूप जवळ आहोत. पॅलेस्टिनी जनतेने हा शांततेचा प्रस्ताव स्वीकारावा अन्यथा त्यांच्या स्वतःच्या भवितव्याची जबाबदारी स्वतःच घ्यावी. – डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष

अद्याप सारे काही संपलेले नाही. ‘हमास’ने हा प्रस्ताव नाकारला किंवा प्रस्ताव स्वीकारून नंतर त्यांना हवे तसे वागू लागले, तर इस्रायल स्वतःच त्यांना संपविण्याचे उरलेले काम पूर्ण करेल. – बिन्यामिन नेतान्याहू, इस्रायलचे पंतप्रधान

पाकिस्तानचे कौतुक, इतर देशांचेही आभार

‘गाझामधील संघर्ष संपावा, यासाठी आखलेल्या नियोजनाला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनिर यांनी १०० टक्के पाठिंबा दिला आहे,’ असेही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. गाझामधील शांततेसाठी सुरू असलेल्या चर्चेत इतर जागतिक नेत्यांबरोबरच पाकिस्तानचे हे दोन्ही नेते सुरुवातीपासून सक्रिय सहभागी होते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. पाकिस्तानबरोबरच ट्रम्प यांनी सौदी अरेबिया, कतार, यूएई, जॉर्डन, तुर्कीये या देशांचेही आभार मानले.