Donald Trump On India-Russia Relationship: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल भारतावर २५ आयात कर लागू केला आहे. यानंतर काही तासांतच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि रशियातील व्यापार आणि संबंधांवर टीका केली आहे. ही टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, “मला काही फरक पडत नाही, भारत आणि रशियाने मिळून दोघांच्या अर्थव्यवस्था बुडवाव्यात.”

मला पर्वा नाही…

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल हँडलवर एका पोस्टमध्ये लिहिले आहे. ते म्हणाले की, “भारत रशियासोबत काय करतो याची मला पर्वा नाही. ते त्यांच्या मृत अर्थव्यवस्था एकत्रितपणे बुडवू शकतात, मला फक्त काळजी आहे. आम्ही भारतासोबत खूप कमी व्यापार केला आहे; त्यांचे कर खूप जास्त आहेत, जगातील सर्वाधिक आहेत. त्याचप्रमाणे, रशिया आणि अमेरिका एकत्र जवळजवळ कोणताही व्यवसाय करत नाहीत.”

भारत-अमेरिकीच्या व्यापारात अडथळे

ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून भारतीय वस्तूंवर २५ टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतावर टीका केली. त्यांनी रशियाकडून भारताच्या लष्करी उपकरणे आणि ऊर्जा खरेदीचा उल्लेख करत, भारताच्या संरक्षणवादी धोरणांमुळे आणि अत्याधिक आयात शुल्कांमुळे अमेरिकेला भारतासोबत तुलनेत कमी व्यापार करावा लागतो, असे म्हटले. या कारणांमुळे भारत-अमेरिकीच्या व्यापारात अडथळे निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

पाकिस्तानशी तेल करार

भारतावर २५ टक्के कर लादल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी जाहीर केले की, त्यांच्या प्रशासनाने पाकिस्तानसोबत एक करार केला आहे. या कराराद्वारे दोन्ही देश इस्लामाबादच्या तेलसाठ्यांचा विकास करण्यासाठी एकत्र काम करणार आहेत. ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, “आम्ही नुकताच पाकिस्तानसोबत एक करार केला आहे, ज्याद्वारे पाकिस्तान आणि अमेरिका तेलसाठे विकसित करण्यासाठी एकत्र काम करतील.”

पोस्टमध्ये पुढे ट्रम्प म्हणाले, “आम्ही या भागीदारीचं नेतृत्व करण्यासाठी तेल कंपनी निवड प्रक्रिया राबवत आहोत. कोण जाणे, कदाचित ते भविष्यात भारतालासुद्धा तेल विकतील.”

भारत-रशिया संबंधांवर आक्षेप

पाकिस्तानबरोबरच्या कराराची घोषणा करण्यापूर्वी ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर २५% शुल्क लावण्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी असेही सांगितले होते की, रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्रे खरेदी केल्याबद्दल भारताकडून “एक अनिश्चित दंड” आकारला जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रुथ सोशलवर पोस्ट करताना ट्रम्प म्हणाले की, भारतावरील ही कारवाई १ ऑगस्टपासून लागू केली जाईल. ते पुढे म्हणाले, “भारताने नेहमीच आपली लष्करी उपकरणे मोठ्या प्रमाणात रशियाकडून खरेदी केली आहेत आणि चीनसोबतच ते रशियाचे सर्वात मोठे ऊर्जा खरेदीदारही आहेत. रशियाने युक्रेनमधील हत्या थांबवाव्या अशी सर्वजण अपेक्षा करत असताना हा व्यापार होत आहे, ही बाब चांगली नाही.”