अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि २०२४ च्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार असलेले डोनाल्ट ड्रम्प यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. ते म्हणाले, जर मी पुन्हा जिंकलो तर एका दिवसासाठी हुकूमशहा बनणार आणि दोन कामं करणार असल्याचे म्हटले आहे. हे विधान करण्याच्या एक दिवस आधी त्यांनी असेही म्हटले होते की, जर त्यांच्यावरील खटल्याची सुनावणी सुरू झाली तर संपूर्ण अमेरिकेत गोंधळ उडू शकतो. दरम्यान राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी ट्रम्प यांना खटल्यापासून मोकळीक देण्यात यावी, हा दावा न्यायालयाकडून फेटाळला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे आपल्या भाषणांमध्ये वारंवार सांगत आहेत की, जर ट्रम्प यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली तर अमेरिकन लोकशाहीत मोठी उलथा-पालथ होऊ शकते. तसेच ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला माहिती देताना सांगितले, “माझे विरोधक मला हुकूमशहा असल्याचे सांगून मतं मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी कोणतेही युद्ध सुरू केले नाही. उलट मी सैनिकांना इतर देशातून माघारी बोलविले. पण ते (बायडेन) या निर्णयाला राजकीय हत्यार म्हणून वापरत आहेत.”
‘एक दिवसाचा हुकूमशहा व्हायचंय’
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असेही म्हणाले की, जर मी पुन्हा निवडून आलो तर मला एक दिवसासाठी हुकूमशहा व्हायचे आहे. या एका दिवसात मी अमेरिका-मेक्सिको सीमेवरून होणारी अवैध घुसखोरी बंद करेल आणि दुसरे म्हणजे ऊर्जा प्रकल्पांना नवसंजीवनी देईल.
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्यावर डेमोक्रॅट पक्षाने दोन वेळा महाभियोग आणला होता, पण दोन्ही वेळा रिपब्लिकन सदस्यांच्या बहुमतामुळे त्यांच्यावर कोणतेही संकट ओढवले नव्हते. मात्र आता २०२० साली झालेल्या निवडणुकीतील निकाल उलथवून लावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावर खटला दाखल झाला आहे. ४ मार्च रोजी या खटल्याची पुढील सुनावणी होईल.
मंगळवारी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली असता ट्रम्प यांच्या वतीने तीन वकिलांनी मांडलेली बाजू न्यायालयाला रुचली नाही. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी २०२० साली झालेल्या निवडणुकीचा निकाल उलथवून लावण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून त्यांना सूट मिळावी, अशी विनंती ट्रम्प यांच्या वकिलांनी केली होती. सुनावणीनंतर ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलत असताना, डेमोक्रॅट पक्ष आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर राजकारण केल्याचा आरोप केला.