अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारपासून काही व्यापार भागीदार देशांना करात सवलत देणाऱ्या कार्यकारी आदेशावर (Executive Order) स्वाक्षरी केली आहे. निकेल, सोने आणि इतर काही धातू तसेच रसायने आणि फार्मास्युटिकल कंपाऊंड्स अशा औद्योगिक निर्यातीवर करार केलेल्या व्यापारी भागीदारांना टॅरिफमध्ये सूट देण्यात येणार आहे. या यादीत शून्य आयात शुल्कासाठी ४५ हून अधिक श्रेणी निश्चित केल्या गेल्या आहेत, ज्याच्यावरील शुल्कात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कारभार हातात घेतल्यानंतर पहिल्या सात महिन्यांमध्ये, ग्लोबल ट्रेडिंग सिस्टम सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ज्यामध्ये अमेरिकेची व्यापार तूट कमी करणे आणि व्यापार भागीदार देशांकडून वाटाघाटींमध्ये सवलती मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात टॅरिफ वाढवले आहेत.
या नवीन आदेशानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी लागू केलेल्या त्यांच्या रेसिप्रोकल टॅरिफमध्ये बदल केले आहेत. व्हाइट हाऊसने सांगितले की नव्या आदेशात हायड्रॉक्साइड, रेजिन आणि सिलिकॉनसह अनेक उत्पादनांना सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या या आदेशानंतर अमेरिका आणि इतर देशांमध्ये विशिष्ट व्यापार करार लागू करण्याच्या प्रक्रियेलाही वेग येऊ शकतो.
यामुळे अमेरिकेला विमानाचे सुटे भाग, जेनेरिक औषधे आणि काही अशा उत्पादनांवरील टॅरिफ हटवणे सोपे होईल ज्याने देशांतर्गत पातळीवर नैसर्गिकरित्या उत्पादन, उत्खनन करता येणार नाही. यामध्ये काही खास मसाले आणि कॉफी यांचादेखील समावेश आहे.
राष्ट्रध्यक्षांच्या या आदेशात सांगण्यात आले आहे की हे बदल अमेरिकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर करण्यात आले आहेत. तसेच हे बदल आपत्कलीन परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी योग्य आणि आवश्यक आहेत.या बदलानंतर, अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी आणि वाणिज्य विभागाला इतर देशांबरोबरच्या करारांची अंमलबजावणी करण्यासाठी कारवाई करण्याचा अधिकार असेल. उदाहरणार्थ, डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियन, जपान आणि दक्षिण कोरियाबरोबर केलेले करार. यामुळे ट्रम्प यांना त्यांच्या कार्यकारी आदेशांद्वारे हे बदल लागू करण्याची आवश्यकता नाहीशी होईल.
टॅरिफ आणि काही करार अनेक महिन्यांच्या कालावधीत आक्रमकपणे तयार करण्यात आले होते. यामध्ये अनेक त्रुटी होत्या, ज्याचा परिणाम बाजारावर पडत होता. त्यामुळे अमेरिकेत त्या वस्तू महाग होऊ शकत होत्या ज्या अमेरिकेत उत्पादित केल्या जाऊ शकत नाहीत. त्या वस्तूंना आता टॅरिफमधून सूट दिली जात आहे. यामध्ये एअरोस्पेस, इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय उपकरणे, स्यूडोएफेड्रिन, अँटीबायोटिक्स आणि इतर औषधांचा समावेश आहे. याबरोबरच सिलिकॉन उत्पादन, रेजिन आणि अॅल्युमिनियम हायड़्रॉक्साइड यांचादेखील समावेश आहे.