Donald Trump-Putin Meeting: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामधील बहुचर्चित बैठक अलास्का येथे संपन्न झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवरील प्रत्युत्तर टॅरिफ लावण्याच्या निर्णयाचा विचार करावा लागू शकतो. परंतु आताच असे करण्याची गरज नाही.
बैठकीनंतर फॉक्स न्यूजला मुलाखत देत असताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “आज जे काही घडले त्यावरून त्याचा (टॅरिफ) आताच विचार करण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. दोन किंवा तीन आठवड्यांनी त्याबाबत नक्कीच विचार केला जाईल. पण आज आता त्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला माहितीच आहे की, आजची बैठक सुरळीत पार पडली.”
भारत आणि रशियामधील तेल व्यापार आणि चीनवरील संभाव्य टॅरिफबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ट्रम्प यांनी हे विधान केले. तथापि, रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर लावलेल्या अतिरिक्त टॅरिफ आणि अतिरिक्त दंडाबाबत ते बोलत होते का? हे ट्रम्प यांनी स्पष्ट केले नाही.
ट्रम्प यांची मागच्या महिन्यात धमकी दिली होती की, रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांवर ते दुहेरी कर लावमार आहेत. तसेच रशियावर १०० टक्के टॅरिफ लादण्याची भाषा वापरून युक्रेनमधील युद्ध थांबविण्याचा करार करण्यासाठी त्यांनी ५० दिवसांची मुदत दिली होती.
बैठकीपूर्वी ट्रम्प काय म्हणाले होते?
अलास्कामध्ये पुतिन यांच्याशी भेट घेण्यापूर्वी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, मॉस्कोने तेल आयात करणारा ग्राहक गमावला आहे. जर त्यांनी रशियावर दुहेरी कर लावला तर ते त्यांच्यासाठी विनाशकारी ठरेल. मला ते करावे लागले तर मी करेन.
अमेरिकेच्या अधिकाऱ्याने भारताला दिली धमकी
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील बैठकीत जर परिस्थिती सुधारली नाही तर भारतावर दुहेरी कर लादला जाऊ शकतो, अशी धमकी अमेरिकेच्या वित्त विभागाचे सचिव स्कॉट बेसन्ट यांनी दिली होती. ब्लुमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना ते म्हणाले, रशियाकडून तेल आयात केल्याबद्दल आम्ही भारतावर दुहेरी टॅरिफ लावू शकतो. दर आजच्या बैठकीत सर्व काही सुरळीत झाले नाही तर असा कर लावण्याचा विचार तातडीने होऊ शकतो.