Eric Trump Criticism Of Zohran Mamdani: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र एरिक ट्रम्प यांनी न्यू यॉर्क शहराचे नवनिर्वाचित महापौर झोहरान ममदानी यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, निवडून आलेले महापौर “भारतीय नागरिकांचा द्वेष करतात.”
एरिक ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजचे सूत्रसंचालक शॉन हॅनिटी यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान ही टिप्पणी केली. यावेळी एरिक ट्रम्प यांनी असा युक्तिवाद केला की प्रमुख अमेरिकन शहरांचे रुप आक्रमक अति-डाव्या अजेंडामुळे बदलत आहे. त्यांच्या मते, या वैचारिक बदलामुळे मोठ्या कंपन्यांना समाजवादाशी संबंधित धोरणांबाबत संघर्ष करावा लागत आहे.
यावेळी एरिक ट्रम्प यांनी न्यू यॉर्कच्या कथित अधोगतीबद्दल दु:ख व्यक्त केले आणि म्हटले की, या शहराला एकेकाळी “जगातील सर्वात महान शहर” असा मान होत. परंतु आता राजकारणामुळे मान राहिला नाही.
एरिक ट्रम्प यांनी पुढे बोलताना झोहरान ममदानी यांच्यावर टीका केली आणि असा युक्तिवाद केला की, डेमोक्रॅटिक सोशलिस्टचे प्राधान्यक्रम शहराच्या गरजेपेक्षा वेगळे आहेत. त्यांनी म्हटले की, न्यू यॉर्कमध्ये “एक समाजवादी… कम्युनिस्ट… आहे जो किराणा दुकानांचे राष्ट्रीयीकरण करू इच्छितो, नेतान्याहू यांना अटक करू इच्छितो आणि ज्यू लोकांचा व भारतीयांचा द्वेष करतो.”
ट्रम्प ऑर्गनायझेशनचे कार्यकारी उपाध्यक्ष असलेल्या एरिक ट्रम्प यांनी म्हटले की, “निवडून आलेल्या महापौरांनी सुरक्षित आणि स्वच्छ रस्ते, वाजवी कर राखणे यासारख्या सोप्या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे. असे केल्यास शहर सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय यशस्वी होऊ शकते.”
यावेळी एरिक ट्रम्प यांनी ममदानी यांचा संबंध डेमोक्रॅटिक पक्षाच्या आक्रमक नेत्या अलेक्झांड्रिया ओकासिओ-कॉर्टेझसह इतर पुरोगामी व्यक्तींशी जोडला. याचबरोबर न्यू यॉर्कमधील अॅमेझॉनच्या प्रस्तावित मुख्यालयाला विरोध करण्याच्या त्यांच्या भूमिकेवर टीका केली. “ते न्यू यॉर्क शहरात दहा हजार उच्च पगाराच्या नोकऱ्या आणणार होते आणि त्यांनी त्या कुत्र्यांसारख्या पळवून लावल्या, बरोबर ना?” असे एरिक ट्रम्प म्हणाले.
कोण आहेत झोहरान ममदानी?
- झोहरान ममदानी यांचे वडील महमूद ममदानी युगांडात शिक्षणतज्ज्ञ आहेत आणि आई मीरा नायर भारतीय चित्रपट निर्मात्या आहेत.
- झोहरान यांचा जन्म आणि संगोपन युगांडातील कंपाला येथे झाले आहे.
- ते सात वर्षांचे असताना आपल्या पालकांसह न्यू यॉर्कला स्थलांतरित झाले.
- २०१८ मध्ये त्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळाले आणि त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सीरियन कलाकार रामा दुवाजीशी लग्न केले.
- आता झोहरान ममदानी यांनी नुकत्याच झालेल्या न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.
