एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू असून रशिया दिवसागणिक युक्रेनची राजधानी कीववर ताबा मिळवण्यासाठी वाटचाल करत असताना दुसरीकडे आता अमेरिकेने यात उडी घेतली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तिसरं महायुद्ध टाळण्यासाठी रशियावर गंभीर निर्बंध घालणे हाच पर्याय आहे, असं नमूद केलं आहे. अमेरिकेकडून युक्रेनला तब्बल ३५० मिलियन डॉलर्सची आर्थिक मदत देखील करण्यात आली आहे. मात्र, या सगळ्या कोलाहलामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन यांच्यावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. ओरलँडोमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

२४ तासांत बदलली ट्रम्प यांची भूमिका!

डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी देखील तर्कविसंगत विधानं केल्यामुळे त्यांची चर्चा झाली होती. सुरुवातीला त्यांनी युक्रेनवर हल्ला केल्याच्या रशियाच्या कृतीला ‘हुशार चाल’ म्हणत त्याचं कौतुक केलं होतं. व्लादिमिर पुतीन यांची बाजू घेतली होती. पण २४ तासांच्या आत त्यांनी आपली भूमिका बदलून रशियावर टीका केली आहे आणि युक्रेनची बाजू घेतली आहे.

“युक्रेनवर हल्ला करण्याची रशियाची कृती पूर्णपणे चुकीची आहे. हे आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन आहे. हे अजिबात घडायला नको होतं. आम्ही युक्रेनच्या जनतेसाठी प्रार्थना करतो”, असं ट्रम्प म्हणाले आहेत.

“जो बायडेन हे कमकुवत राष्ट्राध्यक्ष”

दरम्यान, असं म्हटल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आपल्या बायडेन विरोधावर घसरले. “माझ्या कार्यकाळात युद्ध झालं नाही. मी आपल्याला युद्धातून बाहेर काढलं. कमकुवत राष्ट्राध्यक्षामुळे हे जग कायमच भितीच्या सावटाखाली असणार आहे. व्लादिमिर पुतीन हे जो बायडेन यांना एखाद्या ढोलसारखे वाजवत आहेत”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

“…तर हे अजिबात घडलं नसतं”

“आपल्या निवडणुकांमध्ये घोटाळा झाला नसता, तर हे सगळं घडलंच नसतं. आणि जर मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो, तर हे अजिबात घडलं नसतं. हे फार स्पष्ट आहे. हे अजिबातच घडलं नसतं”, असं ट्रम्प म्हणाले आहेत.

Russia-Ukraine War : “आता जगानं दीर्घकाळ युद्धासाठी तयार राहावं”, फ्रान्सचा गंभीर इशारा; UN सदस्य देशांच्या फौजा युक्रेनच्या मदतीला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जो बायडेन यांचा गंभीर इशारा

दरम्यान, जो बायडेन यांनी शनिवारी केलेल्या निवेदनामध्ये तिसऱ्या महायुद्धासंदर्भात गंभीर इशारा दिला आहे. “जर तिसरं जागतिक महायुद्ध टाळायचं असेल, तर रशियावर निर्बंध घालणं अत्यावश्ययक आहे. तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर तिसरं जागतिक महायुद्ध सुरू करा आणि थेट रशियन सैन्याशी आमने-सामने लढा. किंवा दुसरा म्हणजे जो देश (रशिया) आंतरराष्ट्रीय नियमच पाळत नाही, त्यांच्या विरोधात वागतोय, त्या देशाला त्यासाठी किंमत चुकवायला लावा”, असं बायडेन म्हणाले आहेत.