Donald Trump Tariff on Smartphone: अमेरिकेबाहेर निर्माण केलेल्या सर्व स्मार्टफोनवर आता २५ टक्के आयात शुल्क लागणार आहे. यामध्ये ॲपल आणि सॅमसंगच्या मोबाइलचाही समावेश असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प म्हणाले, “हे धोरण फक्त ॲपलला लक्ष्य करण्यासाठी आखलेले नाही. तर ते त्यापेक्षा अधिक आहे. हेच धोरण सॅमसंग आणि इतर कंपन्यांनाही लागू होईल. अन्यथा ते न्याय्य ठरणार नाही.”

शुक्रवारी सकाळी ट्रुथ या सोशल मीडिया साईटवर केलेल्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, त्यांनी त्यांच्या अपेक्षांबद्दल ॲपलचे सीईओ टीम कुक यांना कळवले आहे. “मी खूप पूर्वीच टीम कुक यांना माझ्या अपेक्षांबद्दल सांगितले होते. अमेरिकेत विकले जाणारे आयफोन हे अमेरिकेतच तयार झालेले असावेत. भारत किंवा कोणत्याही इतर देशात ते तयार झालेले नसावेत”, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते.

जर अमेरिकेत स्मार्टफोन उत्पादित झालेले नसतील तर त्यांना २५ टक्के आयात शुल्क भरावे लागेल. ट्रम्प आणि कुक यांच्यात अलीकडेच झालेल्या बैठकीनंतर हा इशारा देण्यात आला आहे. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ॲपलने चीननंतर भारतात आयफोनचे उत्पादन वाढविण्याची योजना तयार केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प नाराज आहेत.

ट्रम्प यांच्या नव्या विधानामुळे आता नवा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यांनी आधी घोषणा केल्याप्रमाणे इतर देशांवर आयात शुल्क लादले जाणार होते. मात्र आता त्यांनी सांगितल्यानुसार, त्यांच्या देशातील कंपन्यांनाही आयात शुल्क भरावे लागणार आहे. मात्र याचा फटका थेट अमेरिकन ग्राहकांनाच बसू शकतो. वस्तूंवरील कर वाढल्यानंतर त्याचे मूल्य वाढते आणि किरकोळ बाजारात महागाई होते.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, फक्त ॲपलच नाही तर इतर मोठ्या कंपन्यांनी पुन्हा एकदा अमेरिकेत निर्मिती सुरू करावी, यासाठी डोनाल्ड ट्रम्प आग्रही आहेत. यात वाहन, औषध, चीप निर्मात्या कंपनींचा समावेश आहे. पण स्मार्टफोन अमेरिकेत तयार करणे फार खर्चिक बाब होऊ शकते, कारण अमेरिकेत सध्या स्मार्टफोन तयार केले जात नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असोशिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत आयफोनची निर्मिती केल्यास आयफोनची किंमत १२०० डॉलर्सवरून १,५०० ते ३,५०० डॉलर्सवर पोहोचू शकते.