US Tariff on India : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर २५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लागू केलं आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा भारताला फटका बसू लागला आहे. मात्र, या निर्णयामुळे अमेरिकेचं आर्थिक नुकसान होत आहे. अर्थविषयक तज्ज्ञांच्या मते या टॅरिफमुळे भारतापेक्षा अमेरिकेलाच मोठा फटका बसू शकतो. याबाबतची आकडेवारी लवकरच समोर येईल. एसबीआय रिसर्चने १ ऑगस्ट रोजी सादर केलेल्या एका अहवालात म्हटलं आहे की ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर २५ टक्के टॅरिफ लागू केलं आहे. मात्र, या टॅरिफचा भारतापेक्षा अमेरिकेवर अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.
या अहवालात म्हटलं आहे की ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांचा कोणाला अधिक फटका बसतोय ते पुढील काही दिवसांमध्ये येणाऱ्या व्यापारासंबंधीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होईल. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिका भारताकडून दंड वसूल करण्याच्या इराद्याने अधिक टॅरिफ आकारत आहे. हे टॅरिफ येत्या ७ ऑगस्टपासून लागू होणार असून रशियन कच्च्या तेलाची खरेदी व लष्करी उपकरणांच्या खरेदीमुळे ही दंडात्मक कारवाई केली जात असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे.
टॅरिफचा कोणाला अधिक फटका बसेल?
दरम्यान, एसबीआय रिसर्चने आपल्या अहवालात या टॅरिफच्या निर्णयाला ‘वाईट व्यावसायिक निर्णय’ म्हटलं आहे. या टॅरिफच्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. जीडीपीमध्ये घट, महागाईत वाढ व डॉलरचे मूल्य कमी होणे असे परिणाम अमेरिकेला सहन करावे लागतील. अमेरिका सध्या वाढत्या महागाईचा सामना करत आहे. अशातच या टॅरिफमुळे महागाई वाढण्यासह डॉलरचं मूल्य घटू शकतं.
महागाई वाढण्याची शक्यता
या टॅरिफचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. जीडीपीमध्ये घट, महागाईत वाढ व डॉलरचे मूल्य कमी होणे असे परिणाम अमेरिकेला सहन करावे लागतील. अमेरिका सध्या वाढत्या महागाईचा सामना करत आहे. अशातच या टॅरिफमुळे महागाई वाढण्यासह डॉलरचं मूल्य घटू शकतं. तसेच या टॅरिफमुळे अमेरिकेतील कुटुंबांचा खर्च वाढेल. अमेरिकेतील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांचं १,३०० डॉलर्सचं नुकसान होऊ शकतं. तर, उच्च उत्पन्न असलेल्या कुटुंबांवरील ५,००० डॉलर्सचा भार वाढेल. अमेरिकेतील कुटुंबांना सरासरी २,४०० डॉलर्सचा फटका बसू शकतो.
भारतालाही फटका बसणार
या टॅरिफचा भारतालाही फटका बसेल. कारण भारताच्या एकूण निर्यातीपैकी २० टक्के निर्यात एकट्या अमेरिकेला केली जाते. भारत अमेरिकेला प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स, हिरे व इतर रत्ने आणि औषधांची निर्यात करतो. यापूर्वी या वस्तूंवर कमी आयात शुल्क होतं, तर काही वस्तूंवर आयात शुल्क लादलं नव्हतं. मात्र, आता या सर्व क्षेत्रांना २५ टक्के आयात शुल्क द्यावं लागेल. तर, अमेरिकेसमोर औषधनिर्मितीची चिंता आहे. कारण अमेरिका ४७ टक्के औषधे भारताकडून आयात करतो.