China On Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांची जगात चर्चा सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफ वॉरचे परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहेत. आता एवढंच काय तर ट्रम्प यांच्या अनेक धोरणांना अमेरिकेत देखील विरोध होत आहे. मागील काही महिन्यांत ट्रम्प यांनी जगातील अनेक वेगवेगळ्या देशांशी व्यापार करासंदर्भात करार केले आहेत. यानंतर आज (३० जुलै) डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धक्का देणारी घोषणा केली आहे.

अमेरिकेकडून भारतावर १ ऑगस्टपासून २५ टक्के टॅरिफ लागू करण्यात येणार असल्याचा निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केला आहे. एवढंच नाही तर रशियाबरोबर भारताने व्यवसाय केल्यामुळे दंडही वसूल करणार असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा भारताला मोठा फटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला, यावेळी ट्रम्प यांनी चीनलाही इशारा दिला.

‘चीनने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली तर चीनवरही मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादलं जाईल’, असं ट्रम्प यांनी म्हटलं. दरम्यान, ट्रम्प यांनी चीनला दिलेल्या या इशाऱ्यानंतर आता चीनने जोरदार प्रत्युत्तर देत ट्रम्प यांना सुनावलं आहे. ‘व्यापार शुल्काच्या युद्धांत कोणीही जिंकत नाही आणि अशा प्रकारच्या दबावामुळे काहीही साध्य होणार नाही’, असं म्हणत चीनने ट्रम्प यांना सुनावलं आहे. या संदर्भात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक्सवर पोस्ट शेअर करत प्रत्युत्तर दिलं. या संदर्भातील वृत्त एएनआयने एक्सवर दिलं आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटलं?

“चीन नेहमीच आपल्या राष्ट्रीय हितासाठी ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करेल. व्यापार शुल्काच्या युद्धांमध्ये कोणीही जिंकत नाही. त्यामुळे जबरदस्ती आणि दबावामुळे काहीही साध्य होणार नाही. चीन आपल्या सार्वभौमत्वाचं, सुरक्षा आणि विकासाच्या हितांचं रक्षण करेल”, अशा शब्दांत चीनने अमेरिकेला सुनावलं आहे.

अमेरिकेकडून भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानी बुधवारी (३० जुलै) मोठी घोषणा केली. त्यांनी म्हटलं आहे की येत्या १ ऑगस्ट २०२५ पासून भारताला २५ टक्के टॅरिफ (आयात शुल्क) भरावं लागेल. ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी एक पोस्ट करून यासंबधीची माहिती दिली. ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की भारत व अमेरिका मित्र राष्ट्रे असूनही गेल्या काही वर्षांमध्ये उभय देशांमध्ये फारसे व्यावसायिक व्यवहार झालेले नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताकडून दंड वसूल केला जाईल : ट्रम्प

अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, “भारत गेल्या अनेक वर्षांपासून बहुतेक लष्करी उपकरणं, शस्त्रं रशियाकडून खरेदी करत आला आहे. तसेच ऊर्जा खरेदीतही भारत चीनबरोबर रशियाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. रशियाचा युक्रेनमध्ये हैदोस चालू आहे. रशियाचा युक्रेनमधील विध्वंस थांबावा यासाठी सगळं जग प्रयत्न करत आहेत. अशा वेळी भारताने रशियाला अशा प्रकारे आर्थिक लाभ मिळवून देणं योग्य नाही. त्यामुळे भारताला १ ऑगस्टपासून २५ टक्के टॅरिफ व तथा दंड भरावा लागेल. वर नमूद केलेल्या कारणांसाठी भारताला दंड भरावा लागेल.”