पीटीआय, न्यूयॉर्क

रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवल्यामुळे येत्या २४ तासांत भारतावर लक्षणीय प्रमाणात आयात शुल्क लादले जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दिला. त्याचवेळी पुन्हा एकदा भारत आकारत असलेले आयात शुल्क जगात सर्वाधिक असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

ट्रम्प यांनी सोमवारीच आयात शुल्क वाढविण्याची धमकी दिली होती. त्यानंतर ‘सीएनबीसी स्वॉक बॉक्स’ या कार्यक्रमातील मुलाखतीदरम्यान त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ट्रम्प म्हणाले, की सर्वाधिक आयात शुल्क ही भारताबाबत लोकांना न आवडणारी गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर खूप कमी व्यापार करतो. मुलाखतीदरम्यान संभाव्य व्यापार कराराबाबत विचारले असता त्यात काही अचडणीचे मुद्दे असल्याचे ट्रम्प म्हणाले. ‘‘सर्वाधिक आयात शुल्कापासून ते शून्य आयात शुल्क लावण्यास तयार झाले आहेत. पण तेलाबाबत ते जे करतायत (रशियाकडून खरेदी) त्यामुळे हेदेखील पुरेसे नाही,’’ असे उत्तर त्यांनी दिले.

ट्रम्प यांनी सोमवारी दिलेल्या इशाऱ्यावर परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. ‘‘अमेरिका आणि युरोपीय महासंघ त्यांच्या देशासाठी अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंचीही रशियाकडून खरेदी करत आहेत. युरोप अद्याप खते, खनिजे, रसायने, लोह आणि यंत्रसामुग्री रशियाकडून घेत आहे. अमेरिकेचा विचार करता अणुऊर्जा निर्मितीमध्ये लागणारे युरेनियम हेक्झाफ्लोराईड, विद्याुत वाहनांना लागणारे पॅलेडियम आणि खते अमेरिका रशियातून आयात करीत आहे. या पार्श्वभूमीवर भारताला लक्ष्य करणे अन्यायकारक आणि अनावश्यक आहे,’’ असे परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते.

भारत हा चांगला व्यापार भागीदार नाही. त्यामुळे त्यांचा आमच्याशी मोठा व्यापार असला तरी आमच्याकडून तेवढा व्यापार नाही. त्यामुळे आम्ही २५ टक्के शुल्क निश्चित केले. पण मला वाटते की मी २४ तासांत त्यात लक्षणीय वाढ करेन, कारण ते रशियाकडून तेल घेतात. रशियाच्या युद्धाला त्यांची मदत होते. ते असे करणार असतील, तर मला फारसा आनंद होणार नाही. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका

‘दोस्त दोस्त ना रहा’

ट्रम्प यांनी दिलेल्या ताज्या इशाऱ्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारला लक्ष्य केले. ‘‘दोस्त दोस्त ना रहा’’ या चित्रपटगीताचा आधार घेत मोदी यांची ‘हग्लोनॉमी’ (मिठीची मुत्सद्देगिरी) संपूर्णत: कोसळल्याची टीका काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली. परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी दिलेली प्रतिक्रिया ही अतिशय ‘सौम्य’ असल्याचे सांगतानाच पंतप्रधान मोदी या मुद्द्यावर अद्याप मौन का बाळगून आहेत, असा सवालही त्यांनी केला.

‘ट्रम्प यांच्या धमक्या बेकायदा’

मॉस्को : रशियाबरोबर व्यापार सुरू ठेवल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला लक्ष्य करणे बेकायदा आहे, अशी भूमिका रशियाने घेतली आहे. भारतावर भरमसाट आयातशुल्क लादण्याच्या ट्रम्प यांच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कार्यालय असलेल्या ‘क्रेमलिन’चे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, ‘‘आम्ही अनेक विधाने ऐकली ज्या प्रत्यक्षात धमक्या होत्या. विविध देशांना रशियाबरोबरचा व्यापार कमी करायला लावण्याचा प्रयत्न होता. आम्ही अशी विधाने कायदेशीर मानत नाही. सार्वभौम देशांना स्वत:चे हित जपण्याच्या दृष्टीने आपला व्यापार आणि आर्थिक सहकार्यासाठी भागीदार निवडण्याचा अधिकार आहे.’’