US court temporarily reinstates Trump tariffs : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर परस्पर आयात शुल्क (रेसिप्रोकल टॅरिफ) लावलं आहे. परिणामी जग ट्रेड वॉरच्या (व्यापार युद्ध) उंबरठ्यावर आलं आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जगभरातील अनेक देशांमधील शेअर बाजार गडगडले. अशातच एक चांगली बातमी समोर आली होती. ‘यूएस कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड’ने अमेरिकेच्या अध्यक्षांना फटकारत त्यांच्या टॅरिफच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मात्र, अवघ्या काही तासांत न्यायालयाने ही स्थगिती उठवली आहे. त्यामुळे ट्रम्प प्रशासन त्यांच्या निर्णयानुसार आयात शुल्क वसूल करू शकतात.
अमेरिकेच्या एका फेडरल अपील कोर्टाने गुरुवारी अध्यक्ष ट्रम्प यांचे बहुतेक आयात शुल्क तात्पुरते लागू करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाच्या आदल्या दिवशी यूएस कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेडने ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयावर ताशेरे ओढताना हे घटनाविरोधी कृत्य ठरवलं होतं. अमेरिकेतील आयात नियंत्रित करण्यासाठी टॅरिफचा वापर करणे हे घटनेनं अध्यक्षांना दिलेल्या अधिकारांचं उल्लंघन आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकारने त्यांना घटनेनं दिलेल्या अधिकारांच्या कक्षा ओलांडून इंटरनॅशनल इमर्जन्सी इकोनॉमिक पॉवर्स अॅक्टचा (IEEPA) वापर केल्याचं न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केलं होतं. मात्र, अपील कोर्टने ही स्थगिती तात्पुरती उठवली आहे.
ट्रम्प यांनी पुढे केलं राष्ट्रीय सुरक्षेचं कारण
रायटर्सने दिलेल्या वृत्तानुसार फेडरल सर्किटसाठी अपील कोर्टाने ट्रम्प प्रशासनाने दाखल केलेल्या आपत्कालीन प्रस्तावास मंजुरी दिली आहे. न्यायालयाच्या स्थगितीमुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसमोर आव्हान निर्माण झालं असून देशाला हानी देखील पोहोचू शकते असं ट्रम्प प्रशासनाने आपल्या याचिकेत म्हटलं होतं. त्यानंतर अपील कोर्टाने टॅरिफवरील स्थगिती उठवली.
ट्रम्प सरकारने फेडरल अपील कोर्टाकडे ट्रेड कोर्टाचा टॅरिफवरील स्थगितीचा आदेश उठवण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य करत फेडरल कोर्टाने एक आदेश जारी केला आहे. परंतु, ही स्थगिती तात्पुरत्या स्वरुपात उठवण्यात आली आहे. अपील कोर्टाने स्थगिती उठवताना कोणतंही तपशीलवार कारण दिलेलं नाही. त्याऐवजी याचिकाकर्त्यांना (सरकारविरोधातील पक्ष) ५ जूनपर्यंत आणि ट्रम्प प्रशासनाला ९ जूनपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.