US President Donald Trump on Tariff : भारतावर ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर एक नवी पोस्ट केली आहे. ट्रम्प म्हणाले, “आज रात्रीपासून अमेरिकेच्या अब्जावधी डॉलर्सची बचत होईल. अमेरिका पुन्हा एकदा महानतेच्या मार्गाने चालू लागला आहे. आज रात्रीपासून परस्पर आयात शुल्क (रेसिप्रोकल टॅरिफ) लागू होईल आणि आपल्याला अब्जावधी डॉलर्स मिळतील. हे अब्जावधी डॉलर्स अशा देशांमधून येऊ लागतील ज्या देशांनी गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेचा गैरफायदा घेतला आहे.”
मध्यरात्री १२ वाजल्यापासून अमेरिकेने ९० देशांवरील आयात शुल्क लागू केले आहेत. याबाबत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “अमेरिकेचे पैसे घेऊन अनेक देश आनंदी होते. परंतु, अमेरिकेचं नुकसान झालं आहे. आता अमेरिकेचे पैसे अमेरिकेत परत येतील.” यासह ट्रम्प यांनी अमेरिकन न्यायपालिकेवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “डाव्या विचारसरणीच्या लोकांनी न्यायपालिकेवर ताबा मिळवला आहे.”
डोनाल्ड ट्रम्प न्यायपालिकेविरोधात आक्रमक
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “कट्टर डाव्या विचारसरणीची न्यायपालिका ही अमेरिकेच्या विकासाच्या मार्गातील मोठा अडथळा बनली आहे. देश खाली कोसळावा अशी या न्यायपालिकेची इच्छा आहे. देश कमकुवत व्हावा असं तिथे बसलेल्या लोकांना वाटतं. अमेरिकेची न्यायपालिका ही एकमेव अशी संस्था आहे जी अमेरिकेच्या पुन्हा महान बनण्याच्या मार्गात खोडा घालण्याचं काम करत आहे.”
ट्रम्प प्रशासनाने भारतावर ५० टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. अमेरिका व्यापार करत असलेल्या सर्व देशांमध्ये अमेरिकेने भारतावर सर्वाधिक आयात शुल्क लादलं आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारत व अमेरिकेच्या संबंधांमध्ये पहिल्यांदाच इतका तणाव निर्माण झाला आहे. ट्रम्प एका बाजूला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जवळचे मित्र म्हणून संबोधतात आणि दुसऱ्या बाजूला भारताविरोधात भूमिका घेतात, भारतावर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लागू करतात. ट्रम्प यांच्या या विरोधाभासी भूमिकेचा अनेकांनी निषेध केला आहे.
भारताने अमेरिकेबरोबर ट्रम्प यांच्या इच्छेनुसार व्यापार करार करावा यासाठी ट्रम्प भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रम्प यांनी लादलेलं टॅरिफ हा त्याचाच एक भाग आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिकेची पाकिस्तानबरोबर जवळीक वाढत आहे.