Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला कठोर शब्दांत इशारा दिला आहे. रशियाने युक्रेन विरोधातलं युद्ध थांबवलं नाही तर त्याचे गंभीर परिणाम रशियाला भोगावे लागतील असं म्हणत ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी अमेरिकेतल्या केनडी सेंटरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी एका पत्रकाराने त्यांना यासंदर्भातला प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हा इशारा दिला.
नेमका पत्रकाराने प्रश्न काय विचारला?
डोनाल्ड ट्रम्प यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की जर राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी तुमच्या बैठकीनंतर देखील युद्ध थांबवण्यास सहमती दाखवली नाही तर रशियाला याचे परिणाम भोगावे लागतील का? त्यावर क्षणाचाही विलंब न करता ट्रम्प म्हणाले, येस. जर रशियाने युक्रेनविरोधातलं युद्ध थांबवलं नाही तर त्यांना अत्यंत गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल. हे गंभीर परिणाम टॅरिफपासून कठोर निर्बंधांपर्यंत असू शकतात. याबाबत मला सविस्तर काही चर्चा करण्याची आवश्यकता वाटत नाही. मात्र निश्चितच रशियाने युद्ध थांबवलं नाही तर त्यांना प्रचंड गंभीर परिणाम भोगावे लागतील.
अलास्कामध्ये ट्रम्प आणि पुतिन यांची बैठक
रशिया आणि युक्रेन यांच्यात २०२२ मध्ये युद्ध सुरु झालं आहे. मात्र या संघर्षातून कुठलाही पर्याय समोर आलेला नाही किंवा मार्ग निघालेला नाही. हा संघर्ष थांबावा म्हणून अनेक देशांनी प्रयत्न केले मात्र ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. युद्धविरामावर दोन्ही देशांनी अद्याप सहमती दर्शवलेली नाही. १५ ऑगस्टच्या दिवशी अलास्का या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात बैठक होणार आहे. त्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला इशारा दिला आहे. अलास्काची बैठक ही महत्त्वाची मानली जाते आहे. कारण मागच्या साडेतीन वर्षांत रशिया आणि युक्रेन यांच्यात जो संघर्ष निर्माण झाला आहे त्याला विराम देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल असणार आहे.
ट्रम्प यांची जो बायडेन यांच्यावर टीका
डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशिया युद्धासाठी पुन्हा एकदा जो बायडेन यांना जबाबदार धरलं आहे. बायडेन यांच्या धोरणांमुळे रशिया युक्रेन संघर्ष निर्माण झाला, मी त्यासाठी जबाबदार नाही. मी राष्ट्राध्यक्ष असतो तर ही परिस्थिती ओढवलीच नसती. मी आता हा सगळा तंटा मिटवण्यासाठी आलो आहे. मागच्या सहा महिन्यांत मी पाच युद्धं थांबवली आहेत. इराणच्या अणुशक्तीवर आम्ही प्रहार करुन ती नष्ट केली आहे असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.