Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सध्या जगात चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांनी अनेक देशांवर अव्वाच्या सव्वा टॅरिफ लादले आहेत. एवढंच नाही तर अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लवला आहे. त्यांच्या काही निर्णयांचा फटका अमेरिकेलाही बसत आहे. एवढंच नाही तर ट्रम्प यांच्या धोरणांबाबत अमेरिकन नागरिक देखील नाराज असल्याचं बोललं जातं. ट्रम्प हे स्वतःला एक शांतता प्रस्थापित करणारे आणि जागतिक शक्तींशी करार करू पाहणारे व जगाला अमेरिकेची ताकद दाखवू शकणारे नेते म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतं.
डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःला जागतिक व्यापार आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीबाबत कठोर आणि आक्रमक भूमिका मांडत असताना दिसत असले तरी अमेरिकेमध्येच ट्रम्प यांची पत घसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणामधून या संदर्भातील माहिती समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच अप्रूवल रेट ५० टक्क्यांच्या खाली गेल्यामुळे अमेरिकेतच ट्रम्प यांची पत घसरतेय का? असा सवालही आता उपस्थित करण्यात येत आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स नाऊने दिलं आहे.
दरम्यान, ट्रम्प हे विशेषतः अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबाबत आणि अमेरिकेतील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होत असल्याबाबत अनेक दावे करतात. पण अलिकडच्या काही हिंसक घटना पाहिल्या तर त्यामध्ये ट्रम्प यांचे प्रमुख सहयोगी चार्ली कर्क यांच्यावर गोळीबार झाला, त्यामुळे अमेरिकेतील कायदा आणि सुव्यवस्थेवरील ट्रम्प यांच्या पकडीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. त्यामुळे आता जवळजवळ सात महिने सत्तेत राहिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधी मत निर्माण होत असल्याचं बोललं जात आहे. यातच पुढील वर्षी महत्त्वाच्या मध्यावधी निवडणुका जवळ येत आहेत आणि असं असताना ट्रम्प यांची पत अमेरिकेत कमी होत असल्यामुळे त्यांच्या पक्षावर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
सर्वेक्षणातून काय माहिती समोर आली?
देशभरातील १०८४ अमेरिकन प्रौढ व्यक्तींनी ९ सप्टेंबर रोजी केलेल्या रॉयटर्स/इप्सॉस सर्वेक्षणानुसार ट्रम्प यांचं एकूण रेटिंग ४२ टक्के समोर आलं आहे. तसेच ५६ टक्के लोकांनी त्यांच्या कामगिरीला ना पसंत केलं. त्याचबरोबर १३ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या दरम्यान ऑनलाईन ३०,१९६ प्रौढ व्यक्तींनी सर्वेक्षण करणाऱ्या एनबीसी न्यूज डिसिजन डेस्क पोलमध्येही अशाच प्रकारचा ट्रेंड दिसून आला आहे.
यामध्ये ४३ टक्के अमेरिकन लोकांनी ट्रम्प यांच्या कामाच्या कामगिरीला पसंती दर्शवली तर ५७ टक्के लोकांनी ना पसंती दर्शवली. दरम्यान, काही विशिष्ट मुद्द्यांचा विचार केल्यास रॉयटर्स/इप्सॉसच्या सर्वेक्षणात ट्रम्प यांचे सर्वात कमी रेटिंग आर्थिक बाबींमध्ये आढळून आलं. ३९ टक्के लोकांनी महागाई हाताळण्याला आणि ४१ टक्के लोकांनी व्यापार आणि शुल्क हाताळण्याला पाठिंबा दिला.
मुद्द्यांचं विभाग केलं असता कौल काय?
गुन्हे : ४३ टक्के लोकांनी ट्रम्प यांच्या हाताळणीला पाठिंबा दिला.
स्थलांतर : ४२ टक्के लोकांनी ट्रम्प यांच्या हाताळणीला पाठिंबा दिला.
अर्थव्यवस्था : फक्त ३६ टक्के लोकांनी पाठिंबा दिला.
राहणीमानाचा खर्च : फक्त ३० टक्के लोकांनी पाठिंबा दिला.