संयुक्त राष्ट्र संघ, भारत आणि अमेरिका हे मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला दहशतवादी म्हणत असले तरी पाकिस्तानमध्ये मात्र त्याला ‘समाजसेवक’ मानले जाते. लाहोर उच्च न्यायालयाच्या एका आदेशाने काही असाच संदेश जगासमोर आला आहे. हाफिज सईदला त्रास न देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पाकिस्तान सरकारला दिले आहेत. हाफिज सईदला सामाजिक कार्य करू द्यावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

पाकिस्तानच्या एक्स्प्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, लाहोर उच्च न्यायालयाने आपल्या एका आदेशात म्हटले आहे की, पुढील आदेश येईपर्यंत कोणताही त्रास देऊ नये. विशेष म्हणजे याच न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला नजरबंदीतून मुक्त केले होते.

विशेष म्हणजे अमेरिकेने दहशतवादी हाफिज सईदची संघटना मिल्ली मुस्लीम लीगवर बंदीची घोषणा केली त्याचदिवशी न्यायालयाने हा आदेश दिला. दोन महिन्यापूर्वी पाकिस्तानने अमेरिकेच्या दबावाखाली हाफिज सईदद्वारे संचलित मदरसा आणि आरोग्य सुविधांवर गदा आणली होती.

दरम्यान, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी व दहशतवादी संघटनांची यादी बुधवारी जाहीर केली. या यादीतील १३९ दहशतवादी हे पाकिस्तानमधील असल्याने पाकची नाचक्की झाली असून या यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि लष्कर- ए- तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा समावेश आहे.