पद्मावत हा बकवास चित्रपट असून मुस्लिमांनी तो चित्रपट बघू नये, असे विधान एमआयएम पक्षाचे नेते आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. हा चित्रपट बघण्यात वेळ वाया घालवू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

वारंगल येथे असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी जाहीर सभा घेतली. या सभेत ओवेसी यांनी ‘पद्मावत’ चित्रपटाबाबत भाष्य केले. मुस्लिम तरुणांनी पद्मावतसारख्या चित्रपटावर वेळ आणि पैसे वाया घालवू नये. तो चित्रपटच बकवास आहे. या वाईट चित्रपटाच्या मागे धावू नका, असे आवाहन त्यांनी केले. ‘अल्लाहने तुम्हाला चित्रपट बघण्यासाठी पृथ्वीवर पाठवलेले नाही. तुम्ही चांगले काम करावे आणि सदैव लक्षात राहिल असे काम तुम्ही केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पद्मावतसारख्या बकवास चित्रपटासाठी १२ सदस्यीय समिती नेमली आणि या समितीने काही कट्स सांगितले. या चित्रपटाला ऐतिहासिक आधारच नाही. हा चित्रपट काल्पनिक असून अशा चित्रपटाकडे सरकारने ऐवढे लक्ष द्यावे, हे दुर्दैवच आहे, असा चिमटा त्यांनी काढला. चित्रपटाचा प्रश्न आल्यावर मोदी समिती नेमतात. पण तिहेरी तलाकबाबत मोदींना मुस्लिम नेत्यांशी चर्चादेखील करावीशी वाटत नाही, असा आरोप त्यांनी केला.

पद्मावती राणीच्या पाठिशी उभे राहणाऱ्या राजपूतांकडून मुस्लिमांनी धडा घ्यावा. राजपूत पद्मावतविरोधात एकत्र आले आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला. इस्लामिक कायद्यातील बदलांविरोधात मुस्लीम कधीही एकत्र येऊन उभे राहत नाही, असे ओवेसींनी नमूद केले. प्रवीण तोगडिया हे मुस्लीमविरोधी आहेत. अशा व्यक्तीला काँग्रेस पाठिंबा कसा देऊ शकते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ओवेसी सध्या तेलंगणच्या दौऱ्यावर असून राज्याच्या विविध भागांमध्ये ते सभा घेत आहेत. सेव्ह शरीया असे आंदोलन त्यांनी सुरु केले असून मुस्लीम पर्सनल लॉमधील बदलांविरोधात त्यांनी या दौऱ्याचे आयोजन केले आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरयाणा या राज्यांमध्ये ‘पद्मावत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर असलेल्या बंदीवर सुप्रीम कोर्टाने बुधवारी स्थगिती दिली होती. त्यामुळे पुढील आठवड्यात हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.