महाराष्ट्रातील दुहेरी उत्परिवर्तन असलेला विषाणूचा प्रकार देशाच्या दहा राज्यांतही सापडला असून त्यामुळे भारतात करोनाचा प्रसार झपाट्याने होताना दिसत आहे. दिल्लीत ब्रिटनमधील विषाणूचा प्रकारही सापडल्याचे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांत दुहेरी उत्परिवर्तनाचा हा विषाणू आढळून आला आहे. वैज्ञानिकांनी जनुकीय क्रमवारीची माहिती सरकारला सादर केली आहे. त्यानुसार हे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. करोना विषाणूचे प्रकार कसे बदलत आहेत हे प्रथमच स्पष्ट झाले असून दुहेरी उत्परिवर्तन असलेल्या विषाणूचा प्रकार बी.१.६१७ असून तो २ एप्रिल पूर्वीच्या ६० दिवसांतील २४ टक्के नमुन्यात दिसून आला आहे. ५ ऑक्टोबरला या विषाणूचा उत्परिवर्तित प्रकार दिसून आला होता. त्यानंतर तो अनेक नमुन्यांमध्ये सापडला असून जानेवारीनंतर त्याचा भारतातील प्रसार वाढत गेला. भारतातील परिस्थितीबाबतच्या अहवालातच म्हटले आहे की, १ एप्रिलला जे नमुने जनुकीय विश्लेषणात तपासण्यात आले, ते जागितक संचयिकेकडे पाठवले होते. ‘जीसेडट’ या संस्थेने त्यांचे जनुकीय विश्लेषण केले आहे. ब्रिटनमधील बी.१.१.७ हा विषाणू गेल्या ६० दिवसांत १३ टक्के नमुन्यात सापडला असल्याचे स्क्रीप्स रिसर्चच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. हे दोन्ही विषाणू प्रकार भारतासाठी काळजी करायला लावणारे असेच आहेत. भारतातील करोना साथीचा कल यातून स्पष्ट होत आहे. बी.१.६१७ हा

विषाणू महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात दिसून आला होता. ७ एप्रिलपर्यंत दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र हे या विषाणूचे प्रमुख केंद्रस्थान ठरले होते.

डिसेंबरमध्ये आलेला हा विषाणू आता सगळीकडे दिसून येत आहे. प्रत्येक राज्यातील विषाणूंच्या प्रकारांची माहिती स्वतंत्र स्तंभातून दिली आहे, असे इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड  इंटिग्रेटेड बायोलॉजी या संस्थेचे संचालक अनुराग अगरवाल यांनी सांगितले. कुठला उत्परिवर्तित विषाणू कुठे जास्त प्रमाणात आहे याचा अंदाज आम्हाला आला आहे असे त्यांनी स्पष्ट केले. बी. १.६१७ हा प्रकार पश्चिमेकडील महाराष्ट्र व गुजरात राज्यांत जास्त प्रमाणात आहे. बी १.१.७ विषाणू पंजाबात दिसून आला होता. दक्षिण भारतात एन ४४० के विषाणू जास्त आहे. देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी सांगितले की, बी. १.६१७ हा विषाणू विशेष काळजी करण्यासारखा म्हणजे व्हॅरिअंट ऑफ कन्सर्न (व्हीओसी) आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Double mutation virus in ten states of maharashtra abn
First published on: 17-04-2021 at 00:35 IST