नवी दिल्ली : उदार आर्थिक धोरणांद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देणारे आणि आपल्या मुत्सद्देगिरीने परराष्ट्र संबंध सुधरवणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत जगभरातील नेत्यांकडून आदरांजली वाहण्यात आली. अमेरिका, कॅनडा, युरोपीय राष्ट्रे आणि शेजारील राष्ट्रांकडून शोक व्यक्त करण्यात आला. आर्थिक प्रगती, मुत्सद्देगिरीतील योगदानाचे स्मरण जागतिक नेत्यांकडून करण्यात आले. विशेष म्हणजे डॉ. सिंग पंतप्रधान असताना त्यांचे समकक्ष असलेल्या नेत्यांकडून परराष्ट्र संबंध दृढ करण्यात त्यांनी कसे योगदान दिले याचे स्मरण केले.

‘भारताने एक महान व्यक्ती गमावली आहे,’ अशा शब्दांत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आदरांजली अर्पण केली. डॉ. सिंग यांच्या रूपाने फ्रान्सने एक खरा मित्र गमावला आहे. त्यांनी आपले जीवन आपल्या देशासाठी समर्पित केले. त्यांचे कुटुंब आणि भारतातील नागरिकांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असे मॅक्रॉन म्हणाले.

कॅनडाचे माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनीही डॉ. सिंग यांना आदरांजली अर्पण केली. ‘‘भारताचे माजी पंतप्रधान आणि माझे माजी सहकारी डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. असाधारण बुद्धिमत्ता, सचोटी आणि शहाणपण असलेली विलक्षण व्यक्ती डॉ. सिंग होते. त्यांचे कुटुंबीय, नातलगांप्रति शोक व्यक्त करतो,’’ असे हार्पर म्हणाले.

हेही वाचा >>> Dr. Manmohan Singh Funeral : डॉ. सिंग यांना आज निरोप ; शासकीय इतमामात निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार

नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांनी ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘‘डॉ. मनमोहन सिंग दूरदर्शी नेते आणि असाधारण राजकारणी होते. यांच्या निधनाने खूप दु:ख झाले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देईल.’’ मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी डॉ. मनमोहन सिंग यांचा उल्लेख ‘परोपकारी पितृसमान व्यक्तिमत्त्व’ असा केला. ‘‘ते मालदीवचे चांगले मित्र होते. त्यांच्याबरोबर काम करण्यात नेहमीच आनंद वाटला.’’ असे नशीद म्हणाले.

श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी डॉ. सिंग यांना ‘द्रष्टा अर्थशास्त्रज्ञ आणि भारताच्या आर्थिक उदारीकरणाचे शिल्पकार’ असे संबोधले. डॉ. सिंग यांच्या योगदानामुळे भारतासाठी एक नवीन युग सुरू झाले. त्यांचे कुटुंब, मित्र आणि भारतातील लोकांप्रति माझ्या मन:पूर्वक सहवेदना आहेत, असे राजपक्षे म्हणाले. अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांनी ‘भारताने एक प्रतिष्ठित पुत्र गमावला आहे. अफगाणिस्तानचे अतूट सहयोगी आणि मित्र हरपला,’ अशा शब्दांत आदरांजली वाहिली.

वॉशिंग्टन : भारत-अमेरिका नागरी आण्विक करारासह अनेक द्विपक्षीय उपक्रमात भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा मोठा वाटा होता, अशा शब्दांत अमेरिकने डॉ. सिंग यांना आदरांजली वाहिली. उभय देशांतील धोरणात्मक भागीदारीतील महान नेत्यांपैकी ते एक होते. गेल्या दोन दशकांत दोनही देशांनी मिळून जे काही साध्य केले आहे, त्याचा पाया डॉ. सिंग यांच्या कार्याने घातला, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सांगितले.

सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना ब्लिंकन म्हणाले की, अमेरिका-भारत नागरी अणू सहकार्य कराराला पुढे नेण्यात माजी पंतप्रधानांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण होते. दोन्ही देशांच्या परराष्ट्र संबंधांत त्यांचे नेतृत्व मोठी गुंतवणूक होती. भारताच्या वेगवान आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या डॉ. सिंग यांना कायम स्मरणात ठेवले जाईल. अमेरिका आणि भारत यांना जवळ आणण्यासाठी त्यांचे समर्पण नेहमीच लक्षात ठेवू.

१९९१ मध्ये उदारीकरण धोरणामुळे भारतील अर्थव्यवस्थेला सावरण्याचे महत्त्वाचे कार्य डॉ. मनमोहन सिंग यांनी केले. डॉ. सिंग हे सौम्य, मृदुभाषी अर्थशास्त्रज्ञ होते. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणाचे श्रेय त्यांनाच जाते. १९९० च्या दशकात अर्थमंत्री असताना डॉ. सिंग यांनी लाखो नागरिकांना गरिबीतून बाहेर काढले. पंतप्रधानपदी असताना मला ते नेहमी शहाणे, विचारशील आणि प्रामाणिक नेते वाटले. – बराक ओबामा, अमेरिकेचे माजी अध्यक्ष

भारतीय नागरिक बूश यांच्यावर खूप प्रेम करतात

● ‘भारतातील नागरिक तुमच्यावर मनापासून खूप प्रेम करतात…’ २५ सप्टेंबर २००८ रोजी व्हाइट हाऊसमधील ओव्हल कार्यालयात झालेल्या ४० मिनिटांच्या बैठकीनंतर भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बूश यांच्याबाबत अशा प्रकारे कौतुकोद्गार काढले होते. भारत-अमेरिका नागरी आण्विक करार करताना झालेल्या चर्चेत बूश यांची डॉ. सिंग यांनी जोरदार स्तुती केल्याने त्यांच्यावर टीका झाली होती.

● वॉशिंग्टनमध्ये ढगाळ आणि पावसाळी वातावरण असताना दोन नेत्यांच्या आठ मिनिटांच्या पत्रकार संवादादरम्यान व्हाइट हाऊसमध्ये सर्व काही उबदार होते. डॉ. सिंग यांनी बूश यांची प्रशंसा केली आणि सौहार्दपूर्ण भावना दर्शविली होती. ऐतिहासिक नागरी अणू करारामुळे अण्वस्त्र व्यापारात भारताचे ३४ वर्षांचे अलिप्तपण संपुष्टात आले. मात्र अणुकरारावरून यूपीए-१ सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेणारे दोन्ही डावे पक्ष आणि भाजपने सिंग यांनी बुश यांची जोरदार स्तुती केल्याचा निषेध केला होता.

● ‘‘भारतातील लोक तुमच्यावर मनापासून प्रेम करतात आणि आमच्या दोन्ही देशांना एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी तुम्ही जे काही केले आहे त्याने इतिहास घडेल..,ह्णह्ण भारताच्या परराष्ट्र संबंधांवर कायमचा ठसा उमटवणारे सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विरोधकांच्या टीकेनंतरही डॉ. सिंग ठाम राहिले. काँग्रेसने भारत-अमेरिका अणुकरार भारतासाठी सर्वात मोठी घटना असल्याचा गौरव केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चीनभारत संबंधांच्या विकासासाठी योगदान

चीनने शुक्रवारी डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली. ‘‘भारत-चीन संबंधांच्या विकासासाठी डॉ. सिंग यांनी सकारात्मक योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात दोन्ही देशांदरम्यान महत्त्वपूर्ण करार झाले,’’ असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सांगितले. डॉ. सिंग पंतप्रधान असताना चीन व भारताने शांतता, समृद्धीसाठी धोरणात्मक सहकारी भागीदारी स्थापन करण्याची घोषणा केली आणि भारत-चीन सीमाप्रश्नाच्या निराकरणासाठी मार्गदर्शक तत्त्वांवर करार केला, असे माओ म्हणाले.