पीटीआय, नवी दिल्ली
भारताने एकत्रित हवाई संरक्षण शस्त्र यंत्रणेची (आयएडीडब्लूएस) पहिली यशस्वी चाचणी घेतली. बदलत्या भूराजकीय स्थितीमध्ये लष्कराच्या युद्धसज्जतेमध्ये त्यामुळे भर पडली आहे. ओडिशाजवळ शनिवारी दुपारी साडेबारा वाजता ही चाचणी घेण्यात आली. चाचणीदरम्यान संरक्षण, संशोधन व विकास संघटनेचे (डीआरडीओ) शास्त्रज्ञ आणि संरक्षण दलांचे अधिकारी उपस्थित होते. यशस्वी चाचणीबद्दल संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शास्त्रज्ञांचे, संरक्षण दलांचे अभिनंदन केले आहे.

‘आयएडीडब्लूएस’ ही यंत्रणा बहुस्तरीय हवाई संरक्षण यंत्रणा आहे. यामध्ये देशी बनावटीच्या त्वरित प्रत्युत्तर देणाऱ्या जमिनीवरून हवेत हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा, लघु पल्ल्याच्या हवाई संरक्षण यंत्रणेचा, उच्च शक्तीची लेझर प्रणालीवर आधारित शस्त्रयंत्रणेचा (डीईडब्लू) समावेश आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर साडेतीन महिन्यांनी ही यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

‘आयएडीडब्लूएस’च्या यशस्वी निर्मितीबद्दल मी ‘डीआरडीओ’, संरक्षण दलांचे अभिनंदन करतो. या चाचणीमुळे देशाची बहुस्तरावरील हवाई संरक्षण क्षमता सिद्ध झाली आहे. महत्त्वाच्या आस्थापनांना त्यामुळे हवाई संरक्षण देता येणार आहे. – राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

‘आयएडीडब्लूएस’ यंत्रणेत काय?

  • सर्व शस्त्र यंत्रणांचे नियंत्रण ‘सेंट्रलाइज्ड् कमांड अँड कंट्रोल सेंटर’मधून होणार
  • ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ची निर्मिती ‘डीआरडीओ’ने केली आहे. हवाई संरक्षण प्रणालीची ही एक प्रयोगशाळाच आहे.
  • या यंत्रणेत जमिनीवरून हवेत हल्ला करणारी क्षेपणास्त्रे, लघु पल्ल्याची हवाई संरक्षण यंत्रणा, उच्च शक्तीची लेझर प्रणालीवर आधारित शस्त्रयंत्रणा यांचा (डीईडब्लू) समावेश आहे.
  • लघु पल्ल्याची हवाई संरक्षण यंत्रणा आणि ‘डीईडब्लू’ची निर्मिती इमारात येथील संशोधन केंद्र आणि ‘हाय एनर्जी सिस्टीम्स अँड सायन्सेस’ यांनी केली आहे.

तीन लक्ष्यांचा अचूक भेद

संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की चाचणीमध्ये तीन लक्ष्यांचा भेद करण्यात आला. त्यातील दोन लक्ष्ये ही वेगाने येणारी मानवरहित हवाई विमाने होती आणि एक लक्ष्य ड्रोनचे होते. या लक्ष्यांचा एकामागोमाग एक वेगवेगळ्या अंतरांवर आणि उंचीवर भेद करण्यात आला. या चाचणीत क्षेपणास्त्र यंत्रणा, ड्रोनला शोधणारी आणि नष्ट करणारी यंत्रणा, कमांड अँड कंट्रोल यंत्रणा, रडार या सर्व यंत्रणेने अचूक काम केले.