अमेरिकेच्या नासा या संस्थेने मंगळावर पाठवलेल्या क्युरिऑसिटी या गाडीने तेथील दगड फोडून तेथील मातीच्या केलेल्या विश्लेषणावरून तिथे एकेकाळी पाणी असल्याचे आणखी पुरावे मिळाले आहेत, तेथे पाणी होते एवढेच नव्हे तर ते पिण्यायोग्य होते, स्थितीही सजीवांसाठी अनुकूल होती.ही गाडी ज्या गेल विवरात उतरली आहे तिथे अब्जावधी वर्षांपूर्वी पाणी होते. क्युरिऑसिटीवर असलेल्या मास्ट कॅमेऱ्याने तेथील पृष्ठभागाचे अवरक्त किरण तंत्राने छायाचित्रण केले आहे. त्यात काही जलयुक्त खनिजांचे अवशेष दिसून आले आहेत.

क्युरिऑसिटी रोव्हरला इतर भागांपेक्षा येलोनाइफ बे या भागात जास्त पाणी असल्याचे दिसून आले आहे. रशियन बनावटीच्या डायनॅमिक अलबेडो ऑफ न्यूट्रॉन्स या उपकरणाला तिथे पाण्याच्या रेणूतील हायड्रोजन सापडला आहे. तेथील विविध भागातही पाण्याचे प्रमाण वेगळे आहे.
डॉ. मॅक्झिम लिटवाक, स्पेस रीसर्च इन्स्टिटय़ूट, मॉस्को

‘मास्टकॅमच्या मदतीने आम्ही खडकाच्या अनेक भागात ओलावा असल्याचे बघितले आहे, मातीतील खनिजांपेक्षा वेगळी अशी जलयुक्त खनिजे सापडल्याने तेथे पाणी असल्याचा अंदाज करता येतो.’
डॉ. मेलिसा राइस
कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी