Audi Runs over 5 People on Footpath: मद्यधुंद अवस्थेत आलिशान कार बेदरकारपणे चालवून फूटपाथवरील किंवा रस्त्यावरील लोकांना चिरडल्याच्या घटना वारंवार घडत असतात. अशा घटनांमुळे समाजात रोष व्यक्त केला जातो. पोलीस यंत्रणा संबंधितांवर कारवाईही करतात. मात्र अशा घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत. दिल्लीच्या वसंत विहार परिसरात एका मद्यधुंद चालकानं त्याच्या आलिशान ऑडी कारनं फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांच्या कुटुबांना चिरडल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये एका आठ वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी मद्यधुंद चालकाला अटक केली आहे. चालक प्रॉपर्टी डिलर असून त्याचे नाव उत्सव शेखर (वय ४०) असल्याचे सांगितले जात आहे. फूटपाथवर झोपलेले कुटुंब राजस्थानहून आले होते. ९ जुलै रात्री सदर दुर्घटना घडली होती.
जखमींमध्ये लाधी (४०), सबमी (४५), नारायणी (३५), राम चंदर आणि बिमला (८) यांचा समावेश आहे. राजस्थानमधून रोजगाराच्या शोधात हे कुटुंब दिल्लीत आले होते. पाचही जणांवर उपचार सुरू असून लहान मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविले आहे. एका महिलेने सांगितले की, ते फूटपाथवर झोपलेले असताना एका पांढऱ्या रंगाचे वाहन अचानक फूटपाथवर आले. पाच जणांना चिरडल्यानंतर ही कार पुन्हा रस्त्यावर आली आणि २०० मीटर पुढे जाऊन एका ट्रकला तिची धडक बसली.
पोलिसांनी सांगितले की, ऑडी कार फूटपाथवर चढली तेव्हा जखमींना स्वतःचा बचाव करायचा वेळच मिळाला नाही. गाडी अंगावरून गेल्यानंतर जखमींच्या किंकाळ्यामुळे स्थानिक लोक घटनास्थळी धावले आणि त्यांनी पोलिसांना पाचारण केले.
या अपघातानंतर आरोपीला लगेच अटक करण्यात आली. पोलिसांवर बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे गाडी चालवून दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त अमित गोयल यांनी सांगितले की, चालक अपघातावेळी मद्यधुंद अवस्थेत होता.
जखमी महिला नारायणी यांच्याशी एएनआय वृत्तसंस्थेने संवाद साधला. कमरेच्या खालून गाडी गेल्यामुळे आम्ही वाचलो. कधी गाडी आली आणि अंगावरून गेली, हे कळलेच नाही.