कर्नाटकच्या बेळगाव येथे भारतीय लष्कराच्या एका जवानाला सहा जणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित जवानाने मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावरील वाहतूक ठप्प करत उपस्थित लोकांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना गेल्या आठवड्यात बेळगाव येथे घडली आहे. मारहाण झालेल्या लष्कराच्या जवानाचं नाव परशूराम असून ते जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे तैनात आहेत. सध्या ते रजेवर आहेत.
हेही वाचा- धारदार चाकूने पत्नीला १७ वेळा भोसकलं; भारतीय वंशाच्या तरुणाला अमेरिकेत भयावह शिक्षा
घटनेच्या दिवशी परशूराम हे प्रचंड मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावरील वाहने थांबवत होते. त्यांच्या या प्रकाराला संतापलेल्या लोकांनाही त्यांनी अपशब्द वापरत शिवीगाळ केली. यावरून शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर सहा जणांच्या टोळक्याने परशूराम यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. संबंधित सहा जणांनी परशूराम यांना रस्त्याच्या मधोमध खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने संबंधित सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. लष्कराच्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून चार जणांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.