हरयाणातील पंचकुला येथे बाबा राम रहिमला कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या भक्तांनी धुडगूस घालत मोठा हिंसाचार घडवला होता. अशीच परिस्थिती स्वयंघोषित संत आसाराम बापूच्या भक्तांकडूनही घडवली जाऊ शकते, त्यामुळे बलात्कारप्रकरणी आसारामच्या खटल्यावर तुरुंगातील कोर्टातच सुनावणी घेतली जावी, अशी मागणी करणारी याचिका जोधपूर पोलिसांनी राजस्थान हायकोर्टात केली होती, यावर आज सुनावणी झाली.


पुढील आठवड्यात २५ एप्रिल रोजी आसारामप्रकरणावर कोर्ट आपला निर्णय देणार आहे. त्यामुळे पोलिसांनी कोर्टाकडे मागणी केली की, जर शक्य असेल तर २५ ऐवजी १७ तारखेलाच या प्रकरणावर निकाल देण्यात यावा. पोलिसांना संशय आहे की, २५ तारखेसाठी आसारामचे समर्थक पहिल्यापासूनच हिंसाचार घडवून आणण्याची योजना तयार करीत आहेत. आशा वेळी जर निकाल आगोदरच देण्यात आला तर कायदा सुव्यवस्था मोठ्या प्रमाणावर बिघडण्यापासून वाचवता येईल. यावेळी कोर्टाने आसारामच्या वकिलांकडून आज लिखित उत्तर मागवले होते.

गेल्या वर्षी पंचकुलामध्ये राम रहिमच्या प्रकरणामध्ये कोर्टाच्या निकालानंतर हरयाणा, पंजाब आणि चंडीगड येथे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. त्याचप्रमाणे राजस्थानातही होण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. राजस्थानात आणि गुजरातमध्ये आसारामच्या समर्थक आणि शिष्यांची संख्या मोठी आहे. अशात जर हायकोर्टाच्या बाहेर गर्दी जमा झाली तर पोलीस प्रशासनासाठी कायदा सुव्यवस्था कायम राखणे अवघड होऊ शकते.

हिंसाचार घडवून आणण्याबाबत आसाराम समर्थकांकडून योजना आखल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्याचे राजस्थान पोलिसांच्या सुत्रांकडून कळते. याबाबत फर्स्टपोस्टने वृत्त दिले आहे.