Shubhanshu Shukla: “आपला ग्रह खरोखरच निळ्या संगमरवरी दगडासारखा आहे”, असे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी पृथ्वीचे वर्णन केले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर १८ दिवसांचे ऐतिहासिक अभियान पूर्ण केल्यानंतर १५ जुलै रोजी कॅप्टन शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले.

परतल्यानंतर शुभांशु शुक्ला यांनी अंतराळातून पृथ्वीच्या सौंदर्याचं वर्णन करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. “आपला ग्रह एखाद्या निळ्या संगमरवरी दगडासारखा दिसतो. महासागरांची विशालता आणि कक्षीय दृष्टिकोनातून जमीन न पाहता संपूर्ण दिवस घालवण्याचा अनुभव घेतला”, अशा भावना शुभांशु शुक्ला यांनी व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी अंतराळातून काढलेले फोटोदेखील शेअर केले आहेत. यामध्ये ‘अग्नीची वलय’ असा कॅप्शन दिलेला एक फोटोदेखील त्यांनी शेअर केला आहे.

भारतीय हवाई दलाचे पायलट आणि इस्त्रोच्या गगनयान अंतराळवीरांपैकी एक असलेले शुक्ला कॅलिफोर्नियाच्या पॅसिफिक महासागरात सहकारी पेगी व्हिटसन, युरोपियन अंतराळवीर स्लावोस उझनान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरियन अंतराळवीर टिबोर कापू यांच्यासह परतले. हे अंतराळयान भारतीय वेळेनुसार दुपारी ४ वाजून ४५ मिनिटांनी आयएसएसवरून अनडॉक झाले आणि पृथ्वीवर परतण्यासाठी सुमारे २२ तास लागले.

Shubhanshu Shukla at ISS Photo: Indian Express

आसएसएसवरील त्यांच्या जवळपास दोन आठवड्यांच्या कालावधीत शुक्ला यांनी ६० हून अधिक वैज्ञानिक प्रयोगांमध्ये योगदान दिले. त्यापैकी अनेक भारतीय प्रयोगशाळांमध्ये विकसित केले गेले. यामध्ये मानवी शरीरक्रिया विज्ञानावर सूक्ष्म गुरूत्वाकर्षणाचा परिणाम, एआय आधारित आरोग्य निदान आणि जीवन समर्थनासाठी सूक्ष्म शैवाल लागवड यावरील संशोधनाचा समावेश होता. हे प्रयोग भारताच्या आगामी गगनयान मोहिमांसाठी आणि प्रस्तावित भारतीय अंतराळ स्टेशनसाठी महत्त्वपूर्ण आहे.

या प्रयोगांमधील डेटा आणि तांत्रिक अहवाल एकत्रित केले जातील. भविष्यातील भारतीय अंतराळ कार्यक्रमांना बळकटी देण्यासाठी इस्रोने या मोहिमेतील ज्ञानाचा एक समर्पित संग्रह तयार करणार असल्याचे जाहीर केले आहे.

२०१९ मध्ये भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान कार्यक्रमासाठी चार अंतराळवीरांपैकी एक म्हणून निवड झालेल्या शुक्ला यांना सुखोई-३० एमकेआय आणि मिराज-२००० सारखी विमाने २ हजार तासांपेक्षा जास्त काळ उड्डाणाचा अनुभव आहे. अॅक्सिओम-४ मोहिमेतील त्यांचा सहभाग २०२७ मध्ये होणाऱ्या इस्रोच्या पहिल्या स्वदेशी मानवी अंतराळ उड्डाणासाठी एक चाचणी म्हणून पाहिला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या योगदानाची भारत सरकार, इस्रो आणि भारतीय हवाई दलाकडून औपचारिक मान्यता मिळणार आहे. भारतात परतल्यानंतर समारंभ आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम १७ ऑगस्टदरम्यान होण्याची शक्यता आहे.