चीनमधील युन्नान प्रांतासह म्यानमार सीमारेषेवर शुक्रवारी शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले. यात किमान २९ जण जखमी झाले असून भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली.
चीनच्या भूकंप माहिती केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे मोठय़ा प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी यिंगजिआंग गावाला भूकंपाचे धक्के जाणवले. जबरदस्त हादरा बसल्याने घरात बसलेल्या नागरिकांनी सुरक्षेसाठी मोकळ्या मैदानात धाव घेतली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या २९ जणांपैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. भूकंपानंतर काही प्रांतातील वीजपुरवठा खंडीत झाला; परंतु दळणवळण व्यवस्थेवर परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे.