ECI Denies Voter Deletion Allegations Of Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज सकाळी एका पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि त्याचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांचे नाव घेत थेट आरोप केले होते. यामध्ये त्यांनी मतदार यादीतील लाखो नावे संबंधित मतदारांना न कळवताच वगळल्याचे त्यांनी म्हटले होते. आता राहुल गांधींचे हे केद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहे.

निवडणूक आयोगाने एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “हे आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. कोणत्याही मतदाराचे नाव ऑनलाइन वगळता येत नाही, तसेच अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणालाही कोणत्याही मतदाराचे नाव वगळता येत नाही. संबंधित मतदाराला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतेही नाव वगळता येत नाही.

दरम्यान, कर्नाटकच्या अळंद विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावे वगळण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाल्याचे निवडणूक आयोगाने मान्य केले आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगानेच एफआयआर दाखल केल्याचे, आयोगाने स्पष्ट केले आहे.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या आळंद मतदारसंघात कोणीतरी राज्याबाहेरील व्यक्तीने सॉफ्टवेअर आणि फोन नंबर वापरून ६,०१८ मतदारांची नावे डिलीट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी असे फोन नंबर देखील दाखवले जे मतदार याद्यांमधून मतदारांची नावे डिलीट करण्यासाठी वापरले जात होते. राहुल गांधी यांनी पुढे असा दावा केला की, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच मतदारांची नावे डिलीट करण्यात आली होती.

विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, अलंद विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे उमेदवार बीआर पाटील यांनी १०,००० पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला होता.

कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील अलांड विधानसभा मतदारसंघातील आकडेवारीचा हवाला देत राहुल गांधी यांनी दावा केला होता की, या मतदारसंघातून काँग्रेस मतदारांची नावे वगळण्याचा पद्धतशीर प्रयत्न करण्यात आला होता.

राहुल गांधींच्या मते, ज्यांची नावे वगळण्यात आली आणि ज्यांची नावे वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आले त्यांना याची माहिती नव्हती. तथापि, निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा त्यांचे दावे खोटे आणि निराधार असल्याचे फेटाळून लावले. निवडणूक आयोगाने सांगितले की ऑनलाइन मते वगळता येणार नाहीत.

Live Updates