MLA KC Veerendra Arrested by ED in Betting Case : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र पप्पी यांना कथित अवैध ऑनलाइन व ऑफलाइन सट्टेबाजीशी आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या (मनी लॉन्डरिंग) प्रकरणात अटक केली आहे. शनिवारी (२३ ऑगस्ट) त्यांना सिक्किममधून अटक करण्यात आली आहे. ईडीने या कारवाईची माहिती देताना सांगितलं की २२ व २३ ऑगस्ट रोजी त्यांनी के. सी. वीरेंद्र व सदर सट्टेबाजी प्रकरणाशी संबंधित राज्यातील अनेक ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत त्याने कोट्यवधी रुपये, विविध देशांच्या चलनी नोटा आणि सोन्या चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
ईडीने १२ कोटी रुपये रोख, एक कोटी रुपये किमतीचं परदेशी चलन, सहा कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, १० किलो चांदी आणि चार गाड्या जप्त केल्या आहेत. मात्र, ईडीने छापेमारीची ठिकाणं अद्याप जाहीर केलेली नाही.
मुंबईसह ३१ ठिकाणी छापेमारी
कर्नाटकमधील चित्रदूर्ग मतदारसंघाचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना शुक्रवारी सिक्कीमची राजधानी गंगटोक येथील दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आलं. त्यानंतर बंगळुरूतील न्यायालयासमोर हजर करण्यासाठी ट्रान्झिट रिमांडमध्ये घेतलं. ईडीचा बंगळुरू विभाग या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. ईडीने या प्रकरणाविषयी अधिक माहिती देताना सांगितलं की त्यांनी २२ व २३ ऑगस्ट रोजी गंगटोक, चित्रदूर्ग, बंगळुरू शहर, हुबळी, जोधपूर, मुंबई व गोव्यासह देशभरातील ३१ ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये ५ कॅसिनोंचा देखील समावेश आहे.
अवैध ऑनलाइन व ऑफलाइन सट्टेबाजीशी संबंधित प्रकरणांमध्ये चित्रदूर्गचे आमदार के. सी. वीरेंद्र व इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने सांगितलं की आतापर्यंतच्या तपासाअंती आमच्या निदर्शनास आलं आहे की आरोपी किंग ५६७ या नावाने अनेक ऑनलाइन सट्टेबाजी सकेंतस्थळं चालवत आहेत. डायमंड सॉफ्टेक, टीआरएस टेक्नोलॉजीज, प्राइम-९ टेक्नोलॉजीस या के. सी. वीरेंद्र यांच्या कॉल सेंटर व गेमिंग व्यवसायाशी संबंधित कंपन्या आहेत. या कंपन्यांद्वारे ऑनलाइन व ऑफलाइन सट्टेबाजी चालू होती.
ईडीने आज केलेल्या छापेमारीनंतर १७ बँक खाती, २ बँक लॉकर गोठवण्यात आले आहेत. यासह के. सी. वीरेंद्र यांचे भाऊ के. सी. नागराज व त्यांचे पुत्र पृथ्वी एन. राज यांची घरं आणि यांच्याशी संबंधित ठिकाणांवर देखील छापेमारी करण्यात आली. तिथे ईडीला मोठ्या प्रमाणात संपत्ती व आक्षेपार्ह दस्तावेज सापडले आहेत. या दस्तावेजांच्या आधारे ईडी पुढील तपास करत आहे.