नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि प्राप्तिकर विभाग हे भाजपचे ‘प्रचारकर्ते’ आणि ‘आघाडीचे योद्धे’ असल्याची टीका काँग्रेसने शुक्रवारी केली. भाजपने त्यांना ‘विरोधी पक्षाच्या नेत्यांना भीती दाखवण्याचे’ आणि ‘भाजपमध्ये प्रवेश करायला लावण्याचे’ लक्ष्य नेमून दिले आहे, असा आरोप काँग्रेसच्या माध्यम व प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत केला.

ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाने काही काळापासून विरोधी पक्षाच्या नेत्यांना सातत्याने लक्ष्य केल्याचा आरोप केला जात आहे. गुरुवारी राजस्थानात ईडीच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपावरून राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या पार्श्वभूमीवर पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार टीका केली.

हेही वाचा >>> मोठी बातमी! छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना महादेव बेटिंग अ‍ॅपच्या प्रवर्तकाने दिले तब्बल ५०८ कोटी रुपये; ईडीचा दावा

खेरा म्हणाले की, एक चिट फंड प्रकरण दाबून टाकण्यासाठी १५ लाखांची लाच घेताना ईडीच्या अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.  कनिष्ठ अधिकाऱ्यांचा दर १५ लाख रुपये असेल तर  वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दर काय असतील.  मोदी सरकारने ईडीचे दरपत्रक जाहीर करावे अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

तमिळनाडूच्या मंत्र्यावर आयकर विभागाची कारवाई

चेन्नई : तमिळनाडूमधील सार्वजनिक बांधकाममंत्री आणि द्रमुकचे ज्येष्ठ नेते ई व्ही वेलू यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी शोध कारवाई केली. केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केलेल वेलू हे तमिळनाडूमधील तिसरे मंत्री आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई, कोईम्बतूर, तिरुवन्नामलाई आणि करुर या ठिकाणी शोध कारवाई करण्यात आली.

ईडीचे राजस्थानात २५ ठिकाणी छापे

जयपूर : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी राजस्थानात पुन्हा छापे मारण्याची कारवाई केली. कथित ‘जल जीवन मोहीम’ घोटाळय़ाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. राजधानी जयपूर आणि दौसा येथे एकूण २५ ठिकाणी छापे मारण्यात आले. सार्वजनिक आरोग्य आणि अभियांत्रिकी विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुबोध अग्रवाल तसेच अन्य काही संशयितांविरोधात ‘पीएमएलए’अंतर्गत कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

ईडी, सीबीआय आणि आयटी हे भाजपचे सरकारी प्रचारकर्ते आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपमध्ये यावे यासाठी त्यांना भीती दाखवण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. हे मोदीजींचे टूलकिट आहे.

पवन खेरा, काँग्रेस नेते