असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) जमीन घोटाळ्याप्रकरणी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहे. या दोन्ही काँग्रेस नेत्यांची गुरूवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरूवारी या घोटाळयाप्रकरणी चौकशी केली. यापूर्वी केंद्रीय अन्वेषणनेही (सीबीआय) हुडा यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. ज्यावेळी एजीएलला जमीने वाटप झाले होते. त्यावेळी हुडा हे हरियाणा शहर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तर व्होरा हे राज्यपाल होते.

सीबीआयनेही हरियाणातील पंचुकला येथे असोसिएटेड जर्नल्सला जमीन वाटप केल्याप्रकरणी हुडा यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. या प्रकरणी काँग्रेसच्या हायकमांडचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याही चौकशीची शक्यता वर्तवली जात आहे. अंमलबजावणी महासंचालनालयाकडून यासंबंधी प्रारंभीपासून तपास केला जात आहे.
काय आहे प्रकरण?
वर्ष १९८२ मध्ये असोसिएटेड जर्नल्सला पंचकुला येथे जमीन देण्यात आली होती. या जमिनीवर १९९२पर्यंत काहीच बांधण्यात आले नव्हते. त्यानंतर प्राधिकरणाने ही जमीन पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेतली. असोसिएटेड प्रेसला या जमिनीचे पुन्हा वाटप करण्यात आले. प्राधिकरणाचे तत्कालीन अध्यक्ष मुख्यमंत्री भुपिंदर हुडा यांनी या जमिनीचे वाटप करताना नियमाचे उल्लंघन केले होते. व्होरा यांनीही नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.