Eggs Hurled at Toronto Rath Yatra: कॅनडाच्या टोरंटोमध्ये जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून केंद्र सरकारने त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. या रथयात्रेत सहभागी झालेल्या एका भारतीय महिलेनं केलेल्या पोस्टनंतर हा प्रकार उघड झाला. त्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडा सरकारकडे आपली नाराजी व्यक्त केली असून हे कृत्य करणाऱ्यांना त्वरीत शासन करावे, अशी मागणी केली आहे. भारतीय परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे.

नेमकं घडलं काय?

सध्या ओडिसामध्ये सुप्रसिद्ध जगन्नाथ पुरी यात्रा चालू आहे. या पार्श्वभूमीवर कॅनडाच्या टोरंटोमध्ये राहणाऱ्या भारतीयांनीही सोमवारी एकत्र येऊन छोट्या स्वरूपात एक रथयात्रा काढली होती. पण या रथयात्रेवर काही लोकांनी अंडी फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. एका महिलेनं यावेळी चित्रित केलेल्या व्हिडीओमधून घडलेला प्रकार सांगितला आहे.

“आम्ही इथे रथयात्रा काढत असताना बाजूच्या इमारतीवरून काही अंडी आमच्या दिशेनं फेकण्यात आली. आणि दुसरीकडे कॅनडा सरकार म्हणतंय की त्यांच्याकडे वंशभेद होत नाही”, असं या व्हिडीओमध्ये सदर महिला म्हणताना दिसत आहे.

केंद्र सरकारची तीव्र नाराजी

दरम्यान, केंद्र सरकारने यासंदर्भात कॅनडा सरकारकडे आपली परखड भूमिका मांडली आहे. “टोरंटोमधील रथयात्रेदरम्यान काही खोडसाळ लोकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याची बाब आमच्या निदर्शनास आली आहे. एकता, सर्वसमावेशकता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणाऱ्या अशा एका उत्सवाच्या मूळ तत्वाविरोधात हे असं आक्षेपार्ह व अस्वीकारार्ह वर्तन करण्यात आलं आहे. संबंधितांवर तातडीने कारवाई केली जावी, अशी स्पष्ट मागणी आम्ही कॅनडा सरकारकडे केली आहे. लोकांच्या धार्मिक अधिकारांचं रक्षण करण्यासाठी कॅनडा सरकार योग्य ती कारवाई करेल, अशी आम्हाला आशा आहे”, असं रणधीर जयस्वाल यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचीही पोस्ट

दरम्यान, या प्रकारावर जिथे जगन्नाथ पुरी यात्रा काढली जाते, त्या ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनीही संताप व्यक्त केला आहे. “टोरंटोमध्ये रथयात्रेवर अंडी फेकण्यात आल्याचं वृत्त वेदनादायी आहे. ओडिशातील लोकांसाठी रथयात्रेचा हा महोत्सव अत्यंत भावनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. त्यामुळे अशा घटना या फक्त जगभरातील प्रभू जगन्नाथ यांच्या भावनांनाच धक्का पोहोचवत नाहीत तर ओडिशाच्या नागरिकांनाही संतप्त करतात”, असं नवीन पटनाईक सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणाले.