केरळमध्ये करोनाचा संसर्ग सतत वाढत असताना निपाह व्हायरसचा धोका निर्माण झाल्यानं चिंता वाढली आहे. केरळच्या कोळीकोड जिल्ह्यात ३ सप्टेंबर रोजी एका १२ वर्षाच्या मुलाला निपाह व्हायरसची लागण झाली होती आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या बाधित मुलाच्या शरीरातून नमुने घेण्यात आले होते. जे पुण्यातील राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था (NIV) येथे पाठवण्यात आले आणि या मुलाला निपाह विषाणूची व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, या मुलाच्या मृत्यनंतर त्याच्या संपर्कातील आठ जणांचे नमुने देखील पुणे एनआयव्हीमध्ये चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. या सर्वांची निपाह चाचणी निगेटीव्ह आहे आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी ही माहिती दिली.

नमुने घेण्यात आलेल्या आठ जणांमध्ये मृत मुलाच्या आई-वडिलांसह त्याच्यावर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. दरम्यान, “आठ जणांची चाचणी निगेटीव्ह आली ही खूप दिलासादायक बाब आहे. एनआयव्ही पुणे आणि अलाप्पुळा येथील डॉक्टरांच्या देखरेखीखाली कोळीकोड वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत आणखी पाच नमुन्यांची निपाह व्हायरसची चाचणी सुरू आहे,” असे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.

“निपाह व्हायरसच्या सर्व संशयित रुग्णांना सौम्य ताप आणि डोकेदुखी आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर आहे. हाय रिस्क संपर्कांपैकी ३१ कोळीकोड जिल्ह्यातील, तीन कन्नूरचे, चार वायनाडचे आणि प्रत्येकी एक एर्नाकुलम, मलप्पुरम आणि पलक्कड येथील आहेत. या सर्वांवर कोळीकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या (KMCH) निपाह ब्लॉकमध्ये वेगळे उपचार सुरू आहेत,” असंही वीणा जॉर्ज म्हणाल्या.