scorecardresearch

Premium

दिल्लीत ऐक्यासाठी खलबते! शहा, शिंदे, फडणवीस भेटीत समन्वयावर चर्चा, सर्व निवडणुका एकत्र लढण्याचा निर्धार

शिंदे गट आणि भाजपमधील तणाव दिल्ली दरबारी पोहोचल्यामुळेच ही भेट घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

eknath shinde devendra fadnavis meet amit shah
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री तातडीने दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांत सुरू असलेली भाजपची चाचपणी, मंत्रिमंडळ विस्तारातील विलंब, प्रशासनातील महत्त्वाच्या बदल्या अशा विविध कारणांनी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात वाढलेला तणाव या बैठकीनंतर दूर झाल्याचे समजते. त्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी ‘सर्व निवडणुका एकत्रित लढवू’ असे जाहीर केले तर, उपमुख्यमंत्र्यांनी ‘मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार’ असे संकेत दिले.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा तसेच, लोकसभा निवडणूक शिवसेना (शिंदे गट) व भाजप युतीने एकत्रित लढवण्याचा निर्णय या भेटीत घेण्यात आल्याचे शिंदे यांनी ट्विट करून स्पष्ट केले. त्याच वेळी ‘महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे,’ असेही शिंदे यांनी लिहिले आहे. विविध मुद्दय़ांवरून आपल्या गटामध्ये असलेली अस्वस्थता दूर करण्याचा शिंदेंचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गट आणि भाजपमधील तणाव दिल्ली दरबारी पोहोचल्यामुळेच ही भेट घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे फडणवीस यांनी सोमवारी नागपूरमध्ये सांगितले, की मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल, मात्र त्याची वेळ मुख्यमंत्री सांगतील. दोन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढतील यालाही फडणवीसांनी दुजोरा दिला.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट

गेल्या आठवडय़ामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपच्या मुख्यालयामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती. त्यावेळी, महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांची युती अधिक बळकट करण्याबाबत तसेच, संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आठवडाभरातच शिंदे व फडणवीस यांनी शहांची एकत्रित भेट घेतल्याने तिन्ही नेत्यांमधील चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने राज्यातील सत्तांतरासंदर्भातील निकाल दिल्यानंतर प्रथमच शिंदे व फडणवीस यांनी शहांची एकत्रित भेट घेतली.

आमदार अपात्रता,विस्तारावर खल?

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचे घोंगडे भिजत पडले असले तरी, त्याबाबत सकारात्मक विचार केला जात असून लवकरच निर्णय होईल, असे शिंदे यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभाध्यक्षांना निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. शिंदे व ठाकरे गटातील एकूण ५४ आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेणार आहेत. दिल्लीतील बैठकीत शिंदे व फडणवीस यांनी राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात शहांशी चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेवरही निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणुकांसाठी चाचपणी

बृहन्मुंबई महापालिकेसह अन्य महापालिका तसेच, ९० हून अधिक नगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. ओबीसी आरक्षणासंदर्भात खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाची उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर निकाल जाहीर होऊ शकतो. त्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात. भाजपसाठी बृहन्मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून शिंदे गटाचा फारसा प्रभाव नसल्याने भाजपला अनुकूल वातावरण निर्माण करावे लागणार आहे. त्यासाठी भाजपकडून सातत्याने सर्वेक्षण केले जात आहे. निवडणूक ऑक्टोबरमध्ये घेण्याचा विचार होता मात्र, जनमत पाठिशी नसल्याचे जाणवल्यामुळे निवडणूक लांबणीवर टाकली गेल्याचे या घडामोडींशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे.

अस्वस्थता कशामुळे?

’लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून सर्व ४८ मतदारसंघांमध्ये भाजपने चाचपणी सुरू केल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे.

’राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही.

’रालोआतील घटक पक्ष असूनही शिवसेनेच्या खासदारांना योग्य वागणूक मिळत नसल्याचे सांगत शिवसेनेच्या (शिंदे गट) संसदीय गटाचे प्रमुख गजाजन कीर्तिकर यांनी अलीकडेच जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.

’शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. विधानसभाध्यक्ष जोपर्यंत निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत

त्यांच्या मनात रुखरुख कायम राहणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यापेक्षा राज्यातील विकासकामांकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे. भाजप व आमचे राजकीय विचार एकच असल्याने दोन्ही पक्षांमध्ये मतभेद होण्याची शक्यता नाही.

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-06-2023 at 02:52 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×