संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण हे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएनएस विक्रांतचे जलावतरण आणि नौसेनेला नवीन ध्वज प्रदान सोहळ्याचे स्वागत केले आहे. तर हा क्षण शिवभक्तांसाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाचा, गौरवाचा क्षण असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री या संदेशात हा ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हटलं आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विक्रांत युद्धनौका आणि भारतीय नौदलास नवीन ध्वज प्रदान करणे हा भारतीय संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक आणि सुवर्ण असा क्षण आहे. थल-जल आणि आकाश या तिन्ही आघाड्यांवर भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणखी दुणावले आहे. बलशाली, आत्मनिर्भर भारतासाठी हे महत्वपूर्ण पाऊल आहे. त्यासाठी भारतीय सेनेच्या सर्व दलांचे अभिनंदन आणि भारतमातेच्या रक्षणासाठी छातीचा कोट करून उभ्या ठाकलेल्या सर्व शूरवीरांना मनापासून शुभेच्छा आणि मानाचा मुजरा,’ असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

तर उपमुख्यमंत्र्यांनीही राजमुद्रेतून नवे चिन्ह साकारण्यात आल्याचा आनंद व्यक्त केला. “आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. पण नौदलाच्या ध्वजात आजही ब्रिटिशांच्या राजवटीतील खुणा तशाच होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारतंत्र्याची प्रत्येक ओळख पुसली जावी, हा संकल्प केला होता. हा ध्वज तयार करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घेत राजमुद्रेतून नवे चिन्ह साकारण्यात आले आहे,” असं फडणवीस म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, “सागरी सुरक्षा आणि नौदलाची प्रथम निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने केली होती. अतिशय भक्कम आणि मजबूत असे नौदल त्याकाळात साकारण्यात आले होते. त्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण आणि शिवकार्याचा यथार्थ गौरव यानिमित्ताने झाला,” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.