scorecardresearch

अनुराग ठाकूर यांना प्रचार करण्यास तीन दिवस बंदी

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाची कारवाई, खासदार परवेश वर्मांना चार दिवस बंदी

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली आहे. अनुराग ठाकूर यांच्यावर ७२ तासांसाठी म्हणजेच तीन दिवसांसाठी प्रचार कार्यक्रमात सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचबरोबर भाजपाचे खासदार परवेश वर्मा यांच्यावर देखील ९६ तासांसाठी म्हणजेच चार दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

या अगोदर निवडणूक आयोगाकडून अनुराग ठाकूर व परवेश वर्मा यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवण्याचा आदेश भाजपाला देण्यात आला होता. दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात या दोघांनी वादग्रस्त विधाने केली होती. या विधानांवरून प्रचंड वाद विवादही निर्माण झाले होते. निवडणूक आयोगाने या तक्रारींची दखल घेत संबंधित घटनेचा अहवालही मागवला होता. तर एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांनी तुम्ही सांगाल तिथं मी येतो मला गोळी घाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

आणखी वाचा – भाजपाला EC चा दणका: अनुराग ठाकूरांचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवण्याचा आदेश

राजधानी दिल्लीत निवडणूक प्रचाराची धामधूम सुरू असून आम आदमी पार्टी, भाजपा व काँग्रेस या तीन पक्षांत मुख्य लढत आहे. तिन्ही पक्षांनी दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. भाजपाचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ठाकूर यांनी वादग्रस्त घोषणा दिली होती. या सभेत भाषण करताना अनुराग ठाकूर यांनी ‘देश के गद्दारों को..’ अशी घोषणा केली. त्यानंतर सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी ‘गोली मारो *** को’ अशी घोषणाबाजी केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Election commission bans mos finance anurag thakur for 72 hours from campaigning msr

ताज्या बातम्या