पीटीआय, नवी दिल्ली

विविध राज्यांमधील संकेतस्थळे बंद असल्याच्या आणि त्यावरील मतदार याद्यांची माहिती गहाळ असल्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दाव्यांचा शुक्रवारी निवडणूक आयोगाने इन्कार केला. तसेच मतदार यादीतील घोळावर केलेल्या दाव्यांबद्दल शपथपत्र दाखल करण्याचे आवाहनही निवडणूक आयोगाने शुक्रवारी राहुल गांधी यांना केले. दरम्यान, राहुल गांधी शपथपत्र देऊ शकत नसतील तर त्यांनी बेताल आरोपांबद्दल देशाची माफी मागावी, असे आव्हानही आयोगाने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत किमान तीन राज्यांमध्ये मतदान चोरीचा आरोप करत निवडणूक आयोगावर हल्ला बोल केला. त्यावर शुक्रवारी निवडणूक आयोगाने आपली बाजू मांडली. ‘राहुल यांना त्यांच्या विश्लेषणावर विश्वास असेल आणि त्यांना वाटत असेल की त्यांनी केलेले आरोप खरे आहेत, तर त्यांना निवडणूक नियमांनुसार शपथपत्रावर स्वाक्षरी करण्यास आणि मतदार यादीतून चुकीच्या पद्धतीने जोडलेली किंवा काढून टाकलेली नावे सादर करण्यास कोणतीही अडचण नसावी.’ तथापि, राहुल यांनी स्वाक्षरी केली नाही, तर याचा अर्थ असा होईल की त्यांना त्यांच्या विश्लेषणावर आणि परिणामी निष्कर्षांवर, निरर्थक आरोपांवरच विश्वास नाही. अशा परिस्थितीत त्यांनी देशाची माफी मागावी, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, गुरुवारी तीन राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल यांना मतदार यादीतून चुकीच्या पद्धतीने समाविष्ट केलेल्या किंवा वगळलेल्या मतदारांची नावे आणि निवडणूक अधिकाऱ्यांना या प्रकरणात आवश्यक कार्यवाही सुरू करण्यासाठी प्रतिज्ञापत्र जारी करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु राहुल यांनी प्रत्युत्तर देत संविधानाचे रक्षण करण्यासाठी संसदेत आधीच शपथ घेतली असल्याचे म्हटले आहे. तत्पूर्वी राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावरून मतदारयादी काढलेली नाही आणि कोणीही मतदार यादी ‘डाउनलोड’ करू शकते, असे ‘एक्स’वर निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

निवडणूक आयोग-भाजप संगनमत

राहुल गांंधी मतदार यादीच्या विशेष सखोल फेरतपासणीला (एसआयआर) ‘संस्थात्मक चोरी’ असे संबोधत, गरिबांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोग भाजपशी खुलेआम संगनमत करत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. राहुल यांनी त्यांच्या ‘युट्यूब’ वाहिनीवर प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीत हा आरोप केला. ‘आम्ही त्यांची चोरी पकडली’, हे निवडणूक आयोगाला माहीत असल्याने बिहारमध्ये ‘एसआयआर’ केले जात आहे, असा दावा राहुल यांनी केला.

आरोपांचे तर्क चुकीचे – भाजप

निवडणूक आयोगासारख्या संवैधानिक संस्थेच्या अधिकाऱ्यांना भाजपला मदत करण्याच्या भूमिकेचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा राहुल गांधी यांनी दिला होता. त्यावरून विरोधी पक्षनेत्याने अशी भाषा वापरणे योग्य नसल्याचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहेत. तसेच मतचोरीचे आरोप करून राहुल गांधी स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारू घेत आहेत. राहुल यांनी आपला युक्तिवाद मांडण्यासाठी बराच काळ तयारी केली होती, परंतु त्यांच्या आरोपाचे मूलभूत तर्क चुकीचे आहेत, असा दावाही मंत्री यादव यांनी केला आहे.

आरोपांची चौकशी करा : प्रियांका गांधी

मतदार यादीतून चुकीच्या पद्धतीने समाविष्ट केलेल्या किंवा वगळलेल्या मतदारांची नावे आणि निवडणूक अधिकाऱ्यांना या प्रकरणात आवश्यक कार्यवाही सुरू करण्यासाठी शपथपत्र देण्याचे आवाहन तीन राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना केले आहे. त्यावरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वढेरा यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. तसेच राहुल गांधी यांच्या हेराफेरीच्या दाव्यांची चौकशी करण्याची मागणी लावून केली.

‘आता का आक्षेप नोंदवला नाही’

बिहारच्या प्रारूप मतदार यादीतून नावे समाविष्ट करण्यासाठी किंवा वगळण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष निवडणूक आयोगाकडे संपर्क साधत नाही. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर कोणता आक्षेप का नोंदविला नाही, असा प्रश्न निवडणूक आयोगाने शुक्रवारी उपस्थित केल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘काँग्रेस नेते त्यांचे दावे आणि आक्षेप आता नोंदविण्याऐवजी बहुतेक निवडणुकांनंतरच नोंदवतील,’ असा टोलाही आयोगाने लगावल्याचे सूत्रांनी सांगितले. १ ऑगस्ट रोजी बिहारची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे.