नुकत्याच उघड झालेल्या एका पत्रव्यवहारातील माहितीनुसार केंद्र सरकारने निवडणूक आयोगाला कायदेशीरदृष्ट्या प्रभावी अधिकार देण्यास नकार दिला आहे. मतदारांना लाच देण्यात येत असल्याचे विश्वसनीय पुरावे आढळल्यास निवडणूक प्रक्रियाच रद्द करता यावी. त्यासाठी आयोगाला कायमस्वरूपी कायदेशीर अधिकार मिळावेत, अशी मागणी निवडणूक आयोगाने ६ जूनला पत्राद्वारे कायदे मंत्रालयाकडे केली होती. मात्र, कायदे मंत्रालयाने २६ सप्टेंबरला उत्तरादाखल पाठविलेल्या पत्रात निवडणूक आयोगाला अशाप्रकारचे अधिकार नाकारण्यात आले आहेत. सध्या मोदी सरकारने ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा रद्द करून बेहिशेबी पैसा साठवणाऱ्यांना चांगलाच धक्का दिला आहे. मात्र, निवडणुकीच्या काळात हाच बेहिशेबी पैसा राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. अनेकदा निवडणूक सभा आणि मतदारांना सर्रासपणे पैसे वाटण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राच्या माहितीनुसार निवडणूक आयोगाने १९५१च्या लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम ५८ अ मध्ये सुधारणा करण्याविषयी प्रस्ताव पाठवला होता. याद्वारे निवडणूक आयोगाला मतदान केंद्रावर गैरप्रकार घडल्यास निवडणूक प्रक्रिया स्थगित किंवा रद्द करण्याचे अधिकार मिळणार होते. लोकप्रतिनिधी कायद्यात ५८ ब हे नवे कलम समाविष्ट करावे, अशी मागणी निवडणूक आयोगाने केली होती. या कलमाद्वारे मतदारसंघातील लोकांना लाच दिली जात असल्यास कायदेशीर कारवाई करता येऊ शकते. मात्र, मतदान केंद्रावर ताबा मिळवणे आणि लाच देणे या दोन्ही प्रकारांची एकमेकांशी तुलना करता येणार नाही, असे सांगत कायदे मंत्रालयाने निवडणूक आयोगाची ही मागणी फेटाळून लावली. लाच घेतल्याचा आरोपात चौकशी आणि पुराव्याचा भाग येतो. अशी प्रकरणे हाताळण्यासाठी निवडणूक आयोगाकडे कलम ३२४ मध्ये अंतर्भाव नियमांचा आधार आहे. त्यामुळे प्रचलित व्यवस्था कायम ठेवणेच चांगले राहिल, असे कायदे मंत्रालयाचे उपसचिव के.के. सक्सेना यांनी उत्तरादाखल निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र, निवडणूक आयोग या उत्तरावर संतुष्ट नसून हा प्रस्ताव पुन्हा एकदा सरकारपुढे मांडण्याच्या तयारीत आहे.