येत्या सोमवारी चौथ्या टप्प्यात नऊ राज्यांतील ७१ जागांसाठी मतदान होत असून, सध्या यापैकी ४५ मतदारसंघांमध्ये भाजपचे खासदार असल्याने हा टप्पा भाजपसाठी महत्त्वाचा आहे. यापैकी राजस्थान आणि महाराष्ट्रातील सर्व ३० जागा कायम राखण्याचे आव्हान राष्ट्रीय लोकशाही आघाडीसमोर असेल.
आतापर्यंत तीन टप्प्यांमध्ये ३०३ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले आहे. चौथ्या टप्प्यात ७१ जागांसाठी मतदान होईल. यानंतर आणखी तीन टप्प्यांमध्ये १६९ जागांसाठी मतदान होणार आहे. चौथा टप्पा हा भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीकरिता महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये भाजपला चांगल्या यशाची अपेक्षा आहे. गत वेळी राजस्थानात सर्व २५ जागा भाजपने जिंकल्या होत्या. सोमवारी यापैकी १३ जागांसाठी मतदान होत आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता गमवावी लागली होती. या पाश्र्वभूमीवर चांगले यश मिळविण्याचे भाजपसमोर आव्हान असेल.
महाराष्ट्रात १७ जागांसाठी मतदान होत असून, गेल्या वेळी शिवसेनेने नऊ तर भाजपने आठ जागाजिंकल्या होत्या. सर्व १७ जागा कायम राखण्याचे युतीसमोर आव्हान असेल. मुंबईतील सर्व जागा जिंकू, असा दावा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी केला असला तरी यंदा युतीसाठी नक्कीच आव्हान तेवढे सोपे नाही. शिवसेनेने गेल्या वेळी १८ जागा जिंकल्या होत्या. या वेळी पालघरची एक अतिरिक्त जागा सेनेने पदरात पाडून घेतली आहे.
हिंदी भाषिक टप्प्याकडे लक्ष
उत्तर प्रदेशात १३ जागांसाठी मतदान होत असून, यापैकी १२ जागा भाजपकडे तर एक जागा समाजवादी पार्टीकडे आहे. यंदा भाजपसमोर समाजवादी पक्ष आणि बसपा युतीचे आव्हान उभे ठाकले आहे. काँग्रेसमुळे मतांचे विभाजन होऊ शकते. उत्तर प्रदेशातील ८० पैकी २६ मतदारसंघांमध्ये आतापर्यंत मतदान पार पडले आहे. उत्तर प्रदेशातील मतदानावरून सपा-बसपा आणि भाजपने चांगल्या यशाचा दावा केला आहे.
मध्य प्रदेशात सत्ताबदल झाल्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपला रोखणार का, याची उत्सुकता आहे. यंदा भाजपला धक्का देण्याची मुख्यमंत्री कमलनाथ यांची योजना आहे. छिंदवाडा या कमलनाथ यांच्या मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. या वेळी कमलनाथ यांचे पुत्र छिंदवाडामध्ये निवडणूक लढवीत आहेत.
चौथ्या फेरीतील मतदारसंघ आणि पक्षीय बलाबल
- बिहार (५)/ भाजप-३, लोकजनशक्ती-२
- जम्मू-काश्मीर (१)/ पीडीपी-१ (फक्त कुमगाम जिल्हा)
- झारखंड (३)/भाजप-३
- मध्य प्रदेश (६)/ भाजप-५, काँग्रेस १
- महाराष्ट्र (१७)/ भाजप-८, शिवसेना-९
- ओडिशा (६)/बीजेडी-६
- राजस्थान (१३)/ भाजप-१२, काँग्रेस-१
- उत्तर प्रदेश (१३)/भाजप- १२, सप-१
- पश्चिम बंगाल (८)/ तृणमूल काँग्रेस-६, काँग्रेस-१, भाजप-१