अण्णा द्रमुकने सत्ता गमावली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या अण्णा द्रमुकचा पराभव करीत तमिळनाडूमध्ये द्रमुकने सत्ता हस्तगत के ली आहे. पण त्याच वेळी अण्णा द्रमुकला मतदारांनी पूर्णपणे नाकारले नाही. तमिळनाडूचे राजकारण द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन प्रादेशिक पक्षांभोवतालीच केंद्रित असल्याचे निकालावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आणि राष्ट्रीय पक्षांना संधी नाही हे अधोरेखित झाले.

करुणानिधी आणि जयललिता यांच्या पश्चात झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत द्रमुक आणि मित्र पक्षांना स्पष्ट बहुमत मिळाले. २३४ सदस्यीय विधानसभेत द्रमुकला १२५च्या आसपास जागा मिळाल्या. काँग्रेस, डावे पक्ष या आघाडीतील मित्र पक्षांना मिळालेल्या जागांवरून द्रमुक आघाडीने १४५ जागांवर विजय संपादन केला. द्रमुक नेते स्टॅलिन हे लवकरच मुख्यमंत्रिपद स्वीकारतील, असे द्रमुकच्या गोटातून सांगण्यात येत होते.

गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या आणि जयललिता यांच्या निधनानंतर करिश्मा असलेला चेहरा नसतानाही अण्णा द्रमुकला ७५ पेक्षा अधिक जागा मिळाल्या.  अण्णा द्रमुकबरोबर युती के लेल्या भाजपने राज्यात हातपाय पसरण्याचा के लेला प्रयत्न यशस्वी झाला नाही. भाजपला तीन जागांवर आघाडी मिळाली होती. चित्रपट अभिनेते कमल हसन यांनी मक्कल निधी मयम हा पक्ष स्थापन करून राज्यात राजकीय वातावरण तापविले होते. आपला पक्ष राज्यात चांगली कामगिरी करेल, असा दावा ते करीत होते. पण कमल हसन यांचा एकमेव अपवाद वगळता पक्षाचा पार धुव्वा उडाला.

एम. के . स्टॅलिन

रशियाचे तत्कालीन अध्यक्ष स्टॅलिन यांच्या निधनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत सहभागी झाले असतानाच करुणानिधी यांना मुलगा झाल्याचा निरोप देण्यात आला व त्यावरून त्यांनी मुलाचे नाव स्टॅलिन ठेवले. स्टॅलिन सुरुवातीपासूनच आक्र मक आणि बंडखोर स्वभावाचे. करुणानिधी यांच्या हयातीतच त्यांना मुख्यमंत्री होण्याची घाई झालेली. शेवटी  २००९ मध्ये उपमुख्यमंत्रिपद देऊन त्यांचे समाधान करण्यात आले होते. करुणानिधी यांचे राजकीय उत्तराधिकारी होण्यासाठी दोन मुलांमध्ये वाद सुरू झाला तेव्हा करुणानिधी यांनी स्टॅलिन यांना झुकते माप दिले. उपमुख्यमंत्रिपद, चेन्नईचे महापौरपद आणि करुणानिधी सरकारमध्ये ग्रामविकास व स्थानिक प्रशासन खाती त्यांनी भूषविली होती. लोकांमध्ये काम करून मगच सत्तेत पद भूषविण्याचा सल्ला वडील करुणानिधी यांनी मागे एकदा जाहीरपणे दिला होता. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर द्रमुकची सारी सूत्रे हाती घेत राज्यभर यात्रा काढली होती. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, डावे पक्ष यांना बरोबर घेत स्टॅलिन यांनी लक्ष्य साध्य केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election result first assembly election after karunanidhi and jayalalithaa akp
First published on: 03-05-2021 at 00:32 IST